बाप्पांच्या आगमनासाठी महाराष्ट्र सज्ज, खरेदीसाठी तुफान गर्दी; मुंबई, पुणे, कोकणासह तुमच्या शहरात सध्या काय स्थिती?
Tv9 Marathi August 28, 2025 01:45 AM

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सावाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई आणि कोकणात जल्लोषाचे वातावरण आहे. त्यासोबतच पुणे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उद्या २७ ऑगस्टला सर्वत्र गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. बाप्पासाठी लागणारे हार फुल घेण्यासाठी तसेच भाजीपाला घेण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. मुंबईत ठिकठिकाणी आठवडाभर आधीपासूनच विविध गणेश मंडळांनी भव्य आगमन सोहळा करत बाप्पाला मंडपात विराजमान केले आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या अनेक गणेशभक्तांची रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याचे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि कोकण या दोन ठिकाणी उत्सवाचे वातावरण दिसून येत आहे. मुंबईतील गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू केली आहे. तर प्रसिद्ध लालबागच्या राजाचा पहिला लूकही काही दिवसांपूर्वी समोर आला. त्यासोबतच मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सज्ज झाले आहेत. गर्दीचे व्यवस्थापन आणि अनुचित घटना टाळण्यासाठी १७,६०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या बंदोबस्तात घोडेस्वार पोलीस, ड्रोन आणि साध्या वेशातील पोलीस यांचाही समावेश आहे. मुंबईतील मेट्रो लाइन २अ आणि ७ च्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवास करणे अधिक सोयीचे झाले आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने मुंबईहून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणाकडे रवाना होताना दिसत आहेत. सध्या कुर्ला टर्मिनस, एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. कोकणात जाण्यासाठी परशुराम घाटातून वाहनांची मोठी रेलचेल सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने विक्रमी ३८० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच मुंबई आणि कोकणमधील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक सण बनल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगावात २५ फुटी गणपतीची प्रतिष्ठापना

जळगावातील दीक्षित वाडी मित्र मंडळाच्या जळगावच्या विघ्नहर्ताचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यंदा तब्बल २५ फुटांची भव्य मूर्ती बसवण्यात येणार आहे. गेल्या ५५ वर्षांपासून हे मंडळ श्री गणरायाची स्थापना करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने या सोहळ्याला सुरुवात झाली. प्रसिद्ध स्वरगंगा बँडच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पांडे चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि नृत्याच्या गजरात बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा केला.

पोलीस बंदोबस्त आणि वाहतुकीत बदल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. धुळ्यात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नव्याने आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गांवरून रूट मार्च काढण्यात आला. नाशिकमध्येही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. तसेच, डीजे आणि प्रखर लेझर लाईटवर यंदाही निर्बंध कायम आहेत. नाशिक महानगरपालिकेने शहरातील ३८५ गणेश मंडळांना उत्सवासाठी परवानगी दिली आहे, ज्यात पंचवटी विभागात सर्वाधिक ९७ मंडळांचा समावेश आहे.

पुण्यातही गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विशेषतः शिवाजी रोडवरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गुलालाचा वापर होतो. यंदा एक हजार टनपेक्षा जास्त गुलाल लागणार असून, आत्तापर्यंत ४०० टन गुलालाची विक्री झाली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, नंदुरबार शहरातील कमला नेहरू कन्या विद्यालयाच्या सातवीच्या विद्यार्थिनींनी गणरायाच्या गाण्यांवर ठेका धरत गणेशोत्सवाचे स्वागत केले. त्यांच्या उत्साहाने शाळेचे वातावरण भारून गेले होते.

गणेशभक्तांची कोकणाकडे धाव

गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतील गणेशभक्त मोठ्या संख्येने कोकणाकडे रवाना होत आहेत. मुंबईतील कुर्ला टर्मिनसवर कोकणात जाणाऱ्यांची गर्दी दिसत आहे. अनेकजण एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानकांवर दाखल झाले आहेत. कोकणात जाण्यासाठी परशुराम घाटातून वाहनांची मोठी रेलचेल सुरू आहे, सुदैवाने महामार्ग रुंदीकरणामुळे वाहतुकीची कोंडी होत नाही, ही दिलासादायक बाब आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदे गटाने ५७० बसेस सोडल्यानंतर ठाकरे गटानेही २० बसेस कोकणासाठी पाठवून शक्तीप्रदर्शन केले.

पुण्यात पीएमपीच्या जादा फेऱ्या

पुण्यातील नागरिक शहरातील मध्यवर्ती भागातील देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात रात्रीच्या वेळेत जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात किमान ७८८ जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. रात्री १२ नंतर बस पास चालणार नाही आणि दुपारनंतरच्या जादा फेऱ्यांसाठी १० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.