येत्या 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या टुर्नामेंटसाठी टीमची घोषणा झाली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची या टीममध्ये निवड झालेली नाहीय. मोहम्मद शमी मागच्या काही काळात दुखापत आणि फिटनेसच्या समस्येमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीमचा भाग होता. लवकरच तो आपल्याला दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या दरम्यान आशिया कपसाठी निवड न होण्यावर मोहम्मद शमीने मोठं वक्तव्य केलं आहे.
मोहम्मद शमी टीम इंडियासाठी शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळला होता. फेब्रुवारी 2025 मध्ये तो भारतासाठी शेवटचा T20 सामना खेळला. त्यानंतर तो आयपीएल खेळला. पण त्यानंतर तो मैदानापासून लांब आहे. आशिया कपसाठी टीम इंडियात त्याची निवड झालेली नाही. त्यावर शमी मोकळेपणाने बोलला आहे. आता मी पूर्णपणे फिट आहे, असं शमी न्यूज24 शी बोलताना म्हणाला.
शमी काय बोलला?
आशिया कपसाठी टीममध्ये निवड झाली नाही, त्यावर शमी बोलला की, “माझं सिलेक्शन झालं नाही, म्हणून मी कोणाला दोष देणार नाही. माझी कुठलीही तक्रार नाही” “जर, मी टीमसाठी योग्य असीन तर मला घेऊन चला. जर नाही, तर मला काही अडचण नाही” असं शमी स्पष्टपणे बोलला. “टीमसाठी जे सर्वात चांगलं आहे, ते करणं ही सिलेक्टर्सची जबाबदारी आहे. माझा माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा कधी मला संधी मिळेल, मी माझं बेस्ट देईन. मी कठोर मेहनत करतोय. जर, मी दुलीप ट्रॉ्फी खेळू शकतो, तर T20 सुद्धा खेळूच शकतो” असं मोहम्मद शमी म्हणाला.
ब्रोंको टेस्टमध्ये शमी पास झाला का?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दलही मोहम्मद शमी बोलला. “मला काही अपेक्षा नाही. जर, त्यांनी मला खेळवलं, तर मी चांगलं प्रदर्शन करुन माझ्यावतीने 100 टक्के देण्याचा प्रयत्न करेन. मला त्यांनी खेळवावं किंवा खेळवू नये. हे माझ्या हातात नाही” असं शमी म्हणाला. “जर मी दुलीप ट्रॉफीमध्ये पाच दिवसीय क्रिकेट खेळतोय, तर T20 खेळूच शकतो” असं शमीच मत आहे. ब्रोंको टेस्टबद्दल शमी बोलला की, “मला बंगळुरुला बोलवण्यात आलं होतं. मी माझी ब्रोंको टेस्ट पास केली आहे. आता मी खेळण्यासाठी तयार आहे”