किरकटवाडी : दूषित पाण्यामुळे आलेल्या गुइलेन-बॅरी सिंड्रोमच्या आजारातून किरकटवाडीतील लहानगा अनिकेत बगाडे मृत्यूच्या दारातून परतला. मात्र, उजवा हात गमवावा लागल्याने तो अपंगत्वाला सामोरा गेला. तरीही पालकांचा त्याग, गावकऱ्यांचे पाठबळ आणि माजी उपसरपंच यांचा हातभार यामुळे तो पुन्हा शाळेकडे वाटचाल करू लागला आहे.
किरकटवाडी येथील मनपा शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी अनिकेत बगाडे गुइलेन-बॅरी सिंड्रोमसारख्या दुर्मिळ आणि भयंकर आजाराशी धैर्याने झुंज देत आहे. या आजारामुळे चालणे-बोलणे कठीण झाल्याने कुटुंब अंधारात ढकलले गेले होते. मात्र, आई-वडिलांच्या अखंड प्रयत्नांनी आणि वैद्यकीय उपचारांमुळे अनिकेतला पुन्हा जीवनदान मिळाले. पण, या लढ्यात त्याचा उजवा हात गमवावा लागला आणि त्याला अपंगत्व आले.
Pune Liquor Ban : पुण्यात गणेशोत्सव काळात मद्यविक्रीस बंदी; कायदा सुव्यवस्थेसाठी निर्णयया कठीण प्रसंगानंतरही घरची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असल्याने मुलाचे पुढील शिक्षण अनिश्चिततेत होते. त्याचवेळी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने किरकटवाडी गावचे माजी उपसरपंच नरेंद्र हगवणे यांनी ध्वजवंदन कार्यक्रमात जाहीर घोषणा केली की, ‘‘अनिकेतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी माझी आहे,’’ त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण परिसरात समाधानाची लहर उमटली. गावातील शिक्षक, मित्रमंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिकेतच्या पाठीशी उभे आहेत.
अनिकेतचे वडील मजुरी करतात, तर आई घरकाम करून संसार उभा करते. संसाराचा गाडा ओढतानाच मुलाच्या उपचाराचा मोठा खर्च भागविण्यात त्यांनी कधीच हार मानली नाही. ‘‘आजारपणाच्या काळात आम्हाला सर्वांनी मदत केली. त्यामुळेच आमचा मुलगा आज जिवंत आहे,’’ असे अनिकेतच्या वडिलांनी सांगितले.
अनिकेत हा शाळेत अतिशय हुशार विद्यार्थी आहे. दूषित पाण्यामुळे तो आजारी पडला होता. शाळेच्या वतीने आगामी काळात त्याला आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू.
- संगीता करुणकर, मुख्याध्यापिका, मनपा शाळा