Manoj Jarange Patil : '…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद', मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांना वॉर्निंग
Tv9 Marathi August 28, 2025 08:45 PM

“गोरगरीब मराठ्यांची लेकरं पावसात मोटरसायकलवरुन येतात. त्याच्या पाठिमागे खूप मोठ्या वेदना आहेत. फडणवीसांनी या वेदना समजून घेणं गरजेच आहे. मोटरसायकलवरुन मुसळधार पावसात प्रवास करणं अवघड गोष्ट आहे. रात्री पोरं भर पावसात प्रवास करतात, मुंबईच्या दिशेने येत आहेत. त्याच्या पाठिमागचा उद्देश हट्ट नाही. समाजाच्या लोकांना न्याय मिळावा, यासाठी प्रत्येकजण झटतोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईला यायला निघाले आहेत. काल त्यांनी जुन्नरमध्ये मुक्काम केला.

आझाद मैदानातील आंदोलकांच्या संख्येवरही मनोज जरांगे पाटील बोलले. “फडणवीस साहेब कोणाला थांबवणारं नाहीत. गोरगरीबांच्या वेदनाचं सन्मान करतील अशी आशा आहे. एकदिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे. अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरच झटकून दुसऱ्याच्या अंगारवर जाळ टाकणं आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘माझी काय चूक आहे’

“महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीससाहेबांना सिद्ध करायचं आहे की, मी परवानगी दिली, माझी काय चूक आहे. पण फडणवीस साहेब यातून दुसरा असा संदेश जातो की, तुम्ही न्यायालय-न्यायालय म्हणत होते, पण परवानग्या तुमच्याकडेच होत्या. तुम्ही जर एक दिवसाची परवानगी देऊ शकता, तर उपोषणाच्या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

‘मी चर्चेसाठी कुठे नाही म्हटलय’

“तुम्ही जाणुनबुजून एकदिवसाची परवानगी दिली. तुम्ही मोठ मन दाखवायला हवं. गोरगरीबांच्या वेदना खूप आहेत. त्यांच्या वेदना लक्षात घेऊन मागण्या मान्य कराव्या. काल कौतुक केलं, तसं पुढेही करणार” असं मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही सरकारसोबत चर्चा करायला तयार आहात का? या प्रश्नावर “मी चर्चेसाठी कुठे नाही म्हटलय. फक्त एकदिवस मान्य नाही. शिष्टमंडळ भेटायला आले, तर का नाही भेटणार?

‘फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे’

राजकीय नेते तुम्हाला भेटायला यायला घाबरतात. कुठे काही फिस्कटलं तर राजकीय करिअर संपून जाईल अशी भिती वाटते त्यांना, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं. “त्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे. शिकायला पाहिजे. गोरगरीब मराठ्यांची नाराजी अंगावर घेतली की, पुढच्या काळात काय होईल?. बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आली नाही. मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्याविरोधात गेली, तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करणारे असतील” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

‘तुमचे उपकार विसरणार नाहीत’

“म्हणून मी काल सांगितलं. आजही विनंती करुन सांगतो की, योग्य संधी आहे फडणवीस साहेब संधीचं सोनं करण्याची. गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकण्याची. हेच मराठे गुलाल टाकून मरपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे, तुमचे उपकार विसरणार नाहीत. तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही, तुम्ही आमचे वैरी, शत्रू नाहीत” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.