Travel Concession: पत्रकारांना सर्वच एसटी बसमध्ये मोफत प्रवास; प्रस्ताव शासनाकडे पाठवला, व्यवस्थापकीय संचालक कुसेकर यांची माहिती
esakal August 28, 2025 11:45 PM

छत्रपती संभाजीनगर : अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या प्रवासात शंभर टक्के सवलत दिली जाते. मात्र, अलीकडच्या काळातील ई-बससह अन्य काही बसमध्ये ही सवलत नाकारली जाते.

म्हणूनच आता अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सर्वच बसमध्ये सवलत देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

एसटी बसमध्ये समाजातील विविध घटकांतील प्रवाशांना सवलत दिली जाते. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे एक साथीदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती व एक साथीदार, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह तीस प्रकारच्या सवलती दिल्या जातात.

या सवलतींमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही साधी, निमआराम, शिवशाही (आसनी व शयनयान) बसमध्ये आठ हजार किलोमीटरपर्यंत प्रवासात शंभर टक्के मोफत प्रवासाची सवलत दिली जाते. वर्षभरानंतर या प्रवासाच्या रकमेची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला केली जाते.

असे असले तरीही अलीकडच्या काळातील साधी, शयनायन, ई-बस, शिवाईसह अन्य काही बसमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना प्रवास नाकारला जातो. अधिस्वीकृतीचा एसटी महामंडळाने दिलेला पास असतानाही अनेक वेळा वाहकाकडून तिकीट काढण्याचे सांगितले जाते. त्यावेळी पत्रकार आणि वाहक यांच्यामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होते.

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या मोर्चाचे पैठणमध्ये उत्स्फूर्त स्वागत

अनेक तक्रारी एसटी प्रशासनाकडे येत असल्याने आता अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या सर्वच बसमध्ये प्रवासात सवलत मिळावी यासाठी एसटी प्रशासन सकारात्मक आहे. म्हणूनच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सरसकट सर्वच बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर सरसकट सर्वच एसटी बसमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकांना मोफत प्रवासाची सवलत मिळणार असल्याचे डॉ. कुसेकर यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.