Amravati News: मेळघाटात अजूनही मातामृत्यूचे सत्र सुरूच; चिखलदऱ्यातील शहापूर गावात सिकलसेल गर्भवती महिलेचा मृत्यू
esakal August 29, 2025 07:45 AM

अचलपूर/जामली : मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तर आजही मेळघाटातील गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. शहापूर गावातील लक्ष्मी कैलास हेकडे या गर्भवती महिलेचा बुधवारी (ता.२७) मृत्यू झाला. या मृत्यूने पुन्हा एकदा आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

चिखलदरा तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येत असलेल्या शहापूर गावातील सिकलसेलग्रस्त तथा अतिजोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या लक्ष्मी हेकडे (वय २५) या गर्भवती मातेची प्रकृती बिघडली. त्यामुळे घरच्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार केले, पण २७ ऑगस्टला महिलेची प्रकृती चिंताजनक बनल्याने तत्काळ महिलेला चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले.

मात्र वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यावेळी एकही आरोग्य कर्मचारी या गर्भवती महिलेसोबत उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. शहापूर येथील कंत्राटी आरोग्यसेविकेला भुलोरी गावाचा कार्यभार दिल्याने याठिकाणी आरोग्यसेविका नाही, तर स्थायी आरोग्यसेविका प्रशिक्षणासाठी गेल्या. तसेच सामुदायिक आरोग्य अधिकारी सध्या संपावर आहेत. त्यामुळे या जोखमीच्या मातेकडे दुर्लक्ष होत गेले. ज्यामुळे या मातेला वेळेवर उपचार मिळाला नाही आणि त्यातच आज मातेला आपला जीव गमवावा लागला. सदर घटनेची तक्रार चिखलदरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस अधिकारी सुरेश राठोड, जमादार विनोद इसळ करीत आहेत. शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

रक्ताअभावी लक्ष्मीचा मृत्यू

चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात पायाभूत सुविधांचा अभाव असून येथे रक्ताची कोणतीच सुविधा नाही. त्यामुळेच रक्ताअभावी लक्ष्मीचा मृत्यू झाला, असा नातेवाइकांचा आरोप आहे. लक्ष्मी ही दवाखान्यात चालत आली पण तिच्यावर वेळेवर योग्य उपचार झाला असता तर ती वाचू शकली असती, असे तिचे पती कैलास हेकडे व नातेवाईक श्रावण हेकडे यांनी सांगितले.

शहापूर येथील गर्भवती मातेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी महिलेचा मृत्यू झाला होता. सदर माता ही सिकलसेल ग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सदर मातेचे चिखलदरा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून नेमका मृत्यू कशाने झाला, हे समोर येणार आहे.

-डॉ. झाकीर, वैद्यकीय अधीक्षक, चिखलदरा.

Godawari River Flood : पुरपरिस्थिती निर्माण होताच गेवराईच्या त्या बत्तीस गावातील नागरिकांना भरते धडकी

शहापूर येथील गर्भवती माता ही सिकलसेलग्रस्त होती. मंगळवारी महिलेची प्रकृती बिघडली होती. ज्यामुळे घरच्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार केले. मात्र बुधवारी मातेची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेतच मातेचा मृत्यू झाला. नेमका मृत्यू कशाने झाला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

-डॉ. चंदन पिंपळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.