मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा समाज आंदोलन करणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात हे आंदोलन होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठी बांधव एकत्र आले आहेत. मराठा समाजाचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांना मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ होत असून, काही आमदार आणि खासदारांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
मनोज जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार, खासदारांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजुंच्या नेत्यांचा समावेश आहे. यातील काही आमदार, खासदार तर थेट मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत, तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन केलं आहे.
कोणी -कोणी दिला पाठिंबा?
चार सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये
प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी अजित पवार गट, विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी अजित पवार गट, आमदार राजू नवघरे राष्ट्रवादी अजित पवार गट, आणि विलास भुमरे शिवसेना शिंदे गट या आमदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षातील तीन खासदार आणि दोन आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी शरद पवार गट, आमदार कैलास पाटील शिवसेना ठाकरे गट या दोन आमदारांचा आणि खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरद पवार गट, खासदार ओमराजे निंबाळकर खासदार शिवसेना ठाकरे गट आणि खासदार संजय जाधव शिवसेना ठाकरे गट या खासदारांचा समावेश आहे.
यापैकी प्रकाश सोळंके हे या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत, त्यांनी आपला या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. तर दुसरीकडे आमदार विजयसिंह पंडित यांनी आपल्या मतदार संघात या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठे पोस्टर लावल्याचं पहायला मिळालं.