जुन्नर, ता. २८ : राज्यातील चार हजार ८६० केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच केंद्र व केंद्रप्रमुख व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार केंद्रीय प्राथमिक शाळांना समूह साधन केंद्र शाळा, केंद्राला समूह साधन केंद्र तर केंद्रप्रमुखांचे ‘समूह साधन केंद्र समन्वयक’ असे नामकरण करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
नवीन शासन निर्णयातील तरतुदींनुसार, समूह साधन केंद्र समन्वयकांचे अधिकार, कार्य व जबाबदारी स्पष्ट झाली आहे. शैक्षणिक व प्रशासकीय सनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने केंद्रप्रमुखांच्या अधिकाराविषयी असणारा संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.
समूह साधन केंद्र समन्वयकांस शिक्षकांना अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी मदत करणे, शिक्षकांचे प्रशिक्षण, बैठका व कार्यशाळा आयोजित करणे, शाळांना नियमित भेटी देऊन अध्यापन-अभ्यास प्रक्रियेचे अवलोकन करणे आदी बाबी करावयाच्या असून शाळा भेटीत प्रत्यक्ष अध्यापन करावे लागणार आहे. समूह साधन केंद्राला शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य, संदर्भ पुस्तके व माहिती तंत्रज्ञानाचे साहित्य उपलब्ध केले जाणार आहे.
नवीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार समूह साधन केंद्र समन्वयकांचे कार्य, जबाबदारी व अधिकार यात अधिक स्पष्टता आली आहे. केंद्र प्रमुखांना आता अधिक प्रभावीरित्या आपली जबाबदारी पार पाडता येणार आहे.
- बाळासाहेब लांघी, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती.