स्वबळावर उभी राहिलेली कालुस्तेतील रसिका
esakal August 29, 2025 09:45 AM

- rat२८p२.jpg-
२५N८७६६०
चिपळूण ः येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर रसिकाने सुरू केलेले नाश्ता केंद्र.

स्वबळावर उभी राहिलेली कालुस्तेतील ‘रसिका’
नाश्ताविक्रीतून उत्पन्नाचे साधन ; बचतगटातून मिळाले साहित्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कालुस्ते मधलीवाडी येथील रसिका कदम हिने स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवत आपला उद्योजकतेचा मार्ग तयार केला आहे. उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता तिने चिपळूण येथे रस्त्याच्या कडेला नाश्ता सेंटर सुरू केले असून, आज ती आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ ठरली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यात तिला बचतगटाचीही मदत झाली.
स्वतंत्र गाळ्यामध्ये अनेकजण व्यवसाय करण्यास तयार असतात; मात्र रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात व्यवसाय करण्याची अनेकांची इच्छा नसते. रस्त्यावर थांबून व्यवसाय करणाऱ्या उच्चशिक्षित महिलांची संख्या जास्त आहे. कालुस्ते मधलीवाडी येथील दोन वर्षांपूर्वी वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या कदम (वय २३) हिने हंगामानुसार, मेकअपच्या ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. त्यामधून चार पैसे तिला मिळू लागले. कायमस्वरूपी व्यवसाय म्हणून तिने चिपळूण येथे नाश्ता सेंटर सुरू केले. दुकानगाळ्यासह अन्य साहित्यात गुंतवणूक करण्याएवढी तिची आर्थिक परिस्थिती नसल्याने रसिकाने रस्त्याच्या शेजारीच छोटे नाश्ता सेंटर सुरू केले. रसिकाच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वी तर भावाचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. मोठ्या बहिणीचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला. त्यामुळे घरची जबाबदारी आपसूकच रसिकावर पडली होती. तिला कालुस्ते बुद्रुकच्या सरपंच जिया कदम आणि खोपडचे सरपंच महेश शिर्के यांचे पाठबळ लाभले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मोकळ्या जागेत तिने नाश्ता सेंटर सुरू केले आहे. बचतगटाच्या सहकार्याने तिने या व्यवसायासाठी छत्री, टेबल, भांडी असे आवश्यक साहित्य खरेदी केले. इडली, मेदूवडा, पोहे, उपमा, शाबू खिचडी, घावणे आदी पदार्थांची ती विक्री करते. या द्वारे महिन्याला ३५ हजारांची उलाढाल होते.
----
कोट
नोकरीपेक्षा व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते; मात्र त्यासाठी इच्छाशक्ती आणि मेहनत करायला हवी. त्यामधून यशाचा मार्ग मिळतो.
- रसिका कदम, कालुस्ते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.