Chalisgaon News : चाळीसगावात माजी नगरसेवक प्रभाकर चौधरींवर कोयत्याने हल्ला; नाशिकमध्ये उपचार सुरू
esakal August 29, 2025 09:45 AM

चाळीसगाव: शहरातील मुख्य रस्त्यावर भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर मंगळवारी (ता. २६) रात्री अकराच्या सुमारास चौघांनी प्राणघातक हल्ला केला. मारेकऱ्यांनी चौधरी यांच्या चेहऱ्यावर, छातीवर कोयत्याने वार केले. धारदार हत्याराने त्यांच्या उजव्या हाताचा पंजा कापला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या चौधरींवर सध्या नाशिक येथे उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत प्रभाकर चौधरी यांचा मुलगा चेतन चौधरी याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास स्टेशन रोडवरील वैष्णवी साडी सेंटरसमोरून प्रभाकर चौधरी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी कारने प्रभाकर चौधरी यांच्या दुचाकीला मागून धडक देऊन त्यांना जमिनीवर पाडले. कारमधून संशयित सोमा चौधरी व त्याच्या इतर तीन साथीदारांनी उतरून धारदार कोयत्याने प्रभाकर चौधरी यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर व उजव्या हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

प्रभाकर चौधरी यांनी हल्ल्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, काहींना त्यांना पकडून ठेवले. हा हल्ला होत असताना, संशयित सोमा चौधरी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कोयता रस्त्याने ये- जा करणाऱ्यांच्या दिशेने हवेत भिरकावित असल्याने घाबरून कोणीही त्यांना अडविण्याची हिंमत दाखवत नव्हते. घटनास्थळी प्रभाकर चौधरी यांची दोन बोटे पडलेली होती. हल्ला केल्यानंतर मारेकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने निघून गेले.

या हल्ल्याची माहिती मिळताच मुलगा चेतन चौधरी याने तत्काळ येऊन सोबतच्या मित्रांच्या मदतीने वडील प्रभाकर चौधरी यांना गंभीर जखमी अवस्थेत देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ‘तुमच्यावर हल्ला कोणी केला’, असे विचारल्यावर मुलाला प्रभाकर चौधरी यांनी सोमा चौधरी व त्याच्या तीन साथीदारांनी कोयत्याने वार केल्याचे सांगितले. दरम्यान, दवाखान्यात आल्यानंतर प्रभाकर चौधरी यांची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना तत्काळ धुळ्याला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांना धुळ्याला हलविले. प्राप्त माहितीनुसार, प्रभाकर चौधरी यांना सध्या नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

गिरणा नदीपात्रात दोन तलवारी, कोयते

पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील गिरणा नदीपात्रात बुधवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास दोन तलवारी व दोन कोयते असल्याची माहिती पोलिसपाटलांना समजली. त्यांनी तातडीने मेहुणबारेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांना कळविले. त्यावरून हवालदार बाबासाहेब पगारे, मोहन शिंदे, भूषण बाविस्कर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून हत्यारे जप्त केली.

Heart Attack : कर्णकर्कश डॉल्बीचा आवाज, ट्रॅक्टरवर चढून मिरवणुकीचा व्हिडिओ करताना हृदयविकाराच्या धक्का आला अन्

याबाबत मेहुणबारे पोलिसांत नोंद झाली आहे. जप्त केलेली हत्यारे कुठल्या गुन्ह्यातील आहेत, त्याचा तपास करून त्यादृष्टीने ती वर्ग केली जाणार असल्याचे श्री. दातरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. दरम्यान, चाळीसगावात माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात ही हत्यारे वापरून मारेकऱ्यांनी ती नदीपात्रात फेकून दिली असावीत, असा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.