Kolhapur Crime News : कोल्हापूर पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, कुख्यात 'बी. के. गँग'चे १३ जण जिल्ह्यातून हद्दपार
esakal August 29, 2025 09:45 AM

SP Yogeshkumar Gupta : इचलकरंजी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कुख्यात ‘बी. के. गँग’विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली. या टोळीचा प्रमुख राजकुमार ऊर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे याच्यासह तब्बल १३ सदस्यांना एक वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी ही धडक कारवाई केली.

या कारवाईत टोळीप्रमुख राजकुमार ऊर्फ बच्चन कांबळे (वय ४२) याच्यासह गणेश राम ऊर्फ संतोष कांबळे (वय २०), पृथ्वीराज ऊर्फ भैया संतोष कांबळे (वय २१), आदित्य अविनाश निंबाळकर (वय २०), स्वप्नील सोमनाथ तारळेकर (वय २०), समाधान साधू नेटके (वय ३९), अर्जुन लक्ष्मण भोसले (वय २३), यश सुभाष निंबाळकर, ओंकार श्रीपती ढमणगे (वय २०), सुमित बच्चन ऊर्फ राजकुमार कांबळे (वय २०), प्रेम शंकर कांबळे, बालाजी ऊर्फ अविनाश अर्जुन आवळे, ऋत्विक भारत गवळी (वय२१) या १२ जणांचा समावेश आहे.

सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था व नागरिकांच्या जीवित-मालमत्तेचे रक्षण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना गुन्हेगारी टोळ्या व समाजहितास बाधक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडीए व हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी पूर्वीच दिले होते. त्यानुसार गावभाग पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वये ‘बी. के. गँग’च्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

सुनावणीदरम्यान या सर्वांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला होता. मात्र, चौकशीतून ही टोळी परिसरात दहशत निर्माण करून गुन्हेगारी कृत्यांत सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याने १९ ऑगस्टला पोलिस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकाऱ्यांनी १३ जणांना वर्षाकरिता जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले. आदेशाची अंमलबजावणी करून त्यांना जिल्ह्याच्या हद्दीतून घालवले आहे.

हद्दपारी केलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार जिल्ह्याच्या हद्दीत आढळल्यास नागरिकांनी तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३१-२६६२३३३ वर माहिती कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.

Gokul Dudh Sangh Kolhapur : गोकुळ दूध संघाच्या संचालकांवर कारवाई का केली नाही?, याचिकेवर सर्किट बेंचचे निर्देश; अधिकाऱ्यांना नोटीस

आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई

शहरात आतापर्यंत अनेक गँगवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे, मात्र त्यामध्ये गुन्हेगार सदस्यांची संख्या ५ ते ७ होती. या वर्षातील बी. के. गँगचे वाढते कारनामे पाहता पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करत १३ सदस्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.