मांडा-टिटवाळा विभागात नागरी समस्या तीव्र
ठाकरे गटाचे आयुक्तांना साकडे
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) ः पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, नियमित औषध फवारणीचा अभाव, स्थानक परिसरातील अव्यवस्था, अनधिकृत फेरीवाले आणि मच्छी-मटन विक्रेत्यांमुळे निर्माण होणारी गर्दी या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन निवेदन दिले. मांडा-टिटवाळा विभागातील नागरी
समस्यांवर शिवसेनेचे आयुक्तांना साकडे
कल्याण-टिटवाळा यादरम्यान बससेवा सुरू करणे, गणेश मंदिर परिसरात तलाव उद्यान विकसित करणे, स्थानक परिसरातील अव्यवस्था दूर करणे, अनधिकृत विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करणे, रस्ते व गटारे दुरुस्त करणे, इंग्रजकालीन पूल नव्याने उभारणे, तसेच विद्युत टॉवर हटवणे यासह अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या.
शुक्ला यांनी आरोग्यसेवा सुधारणा, नियमित औषध फवारणी आणि कचरा व्यवस्थापनावर भर देण्याची मागणी केली. गणेशोत्सवात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता आवश्यक सुविधा उपलब्ध करून भाविकांना चांगले वातावरण मिळावे, असा हेतूही त्यांनी मांडला.
या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त गोयल यांनी गणेशोत्सवात विभागाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले असून, दिवाळीपर्यंत काही कामे मार्गी लागतील, असेही सांगितले.