Pune Air Pollution : धूळ कमी करण्यासाठी लावावे लागणार सेन्सर, बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेची सूचना
esakal August 30, 2025 07:45 AM

पुणे : पुणे शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. त्याठिकाणी निर्माण होणाऱ्या धुळीमुळे हवा प्रदूषण वाढत आहे. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली उभारावी, अशी सूचना महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्प परिसरात होणाऱ्या प्रदूषणाची पातळी ‘रिअल टाइम’मध्ये समजणार असून, आवश्यक ते नियंत्रण त्वरित साधता येईल.

महापालिकेत झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पर्यावरण उपायुक्त संतोष वारुळे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर आदी उपस्थित होते. ‘डब्ल्यूआरआय’ इंडियाचे संचालक श्रीकुमार कुमारस्वामी यांनी सेन्सर आधारित तपासणीविषयी सादरीकरण केले, तर वारुळे यांनी प्रास्ताविक केले.

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! गणेशोत्सवानिमित्त रात्री 'या' वेळेपर्यंत चालणार मेट्रो; कसं आहे नियोजन?

राज्यातील अनेक शहरांमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० धुलिकणांमुळे वायू प्रदूषणात वाढ होत असल्याने राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिलेल्या निर्देशाप्रमाणे बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविणे बंधनकारक ठरणार आहे. प्रदूषणाची पातळी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुणे हे राहण्यायोग्य शहर असले तरी बांधकाम क्षेत्र व रस्त्यावरील धुळीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना श्वसनाचे त्रास होत असल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

हिवाळ्यामध्ये या धुलीकणांचा होणाऱ्या त्रासाचे परिणाम जास्त दिसून येतात. त्यामुळे महापालिकेतर्फे धुळीचे प्रमाण कमी न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावली जाते. त्यांनी काय उपाययोजना कराव्यात, यासाठीची यादी त्यांना दिली जाते. त्यात या सेन्सरचा समावेश आहे. पण ती लावण्यास टाळाटाळ केली जाते. पण आता बैठकीनंतर याची अंमलबजावणी करणे बंधनकारक होणार आहे.

बांधकामाच्या ठिकाणी धुलिकणांची निर्मिती होऊन, हवा प्रदूषित होते. प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी विना विलंब हे सेन्सर बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी लावावे.

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स स्थापन केली जाणार आहे. हे सेन्सर डॅशबोर्डशी जोडला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचे वास्तविक (रिअल टाइम) आकडे उपलब्ध होतील. धूळ कमी करण्यासाठी कडक पावले उचलली जातील.

- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.