हे लग्नाचे कार्ड तुमचा बँड वाजवेल, क्लिक केलं तर खातं रिकामं! नाही केलं तर…
Tv9 Marathi August 30, 2025 07:45 AM

लग्नाचा हंगाम सुरू होत आहे. अशा वेळी तुमच्या घरी नक्कीच लग्नाचे कार्ड्स येत असतील. पण इंटरनेटच्या युगात आजकाल ऑनलाइन कार्ड्स ही सामान्य गोष्ट झाली आहे. परंतु जर तुमच्याकडे अनोळखी लोकांची ऑनलाइन कार्ड्स येत असतील, तर आता थोडं सावध व्हा. कारण एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी व्यक्तीकडून लग्नाचे कार्ड पाठवले जात आहेत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया…

खरं तर, ही आमंत्रण कार्ड्स तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. आता स्कॅमर्सनी लोकांना फसवण्याची नवी युक्ती शोधली आहे. ही आमंत्रण कार्ड्स नसून APK फाइल्स असतात. या फाइल्स डाउनलोड होताच तुमचा मोबाइल हॅक होण्याचा धोका तर आहेच, शिवाय वैयक्तिक डेटापासून ते प्रत्येक गतिविधीवर सायबर गुन्हेगार नजर ठेवू शकतात. संधी मिळताच ते तुमच्या खात्याचा लॉगिन उघडून त्यात फ्रॉड करु शकतात.

Video: तोंडातून रक्त आलं पण तो थांबला नाही! डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांच्या मते, सायबर गुन्हेगार सध्या मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपवर डिजिटल लग्न कार्ड्स पाठवत आहेत. या डिजिटल कार्डचा वापर मालवेअर पसरवण्यासाठी आणि वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी केला जात आहे. चोरट्यांनी लग्नाच्या कार्डाच्या नावाखाली व्हायरस फाइल्स (APK फाइल्स) पाठवायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे फोनमध्ये मालवेअर डाउनलोड होतं. यामुळे हॅकर्स तुमच्या डिव्हाइसपर्यंत पोहोचतात. सायबर चोरटे याचा फायदा घेऊन लोकांच्या खात्यांमध्ये चोरी करत आहेत.

APK फाइल कशी काम करते?

पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, अशा फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अनोळखी नंबरवरून लग्नाचे कार्ड पाठवले जाते. यामध्ये एक APK फाइल लपलेली असते. जेव्हा ही फाइल डाउनलोड केली जाते, तेव्हा ती फोनमध्ये एक अॅप इंस्टॉल करते, ज्यामुळे हॅकर्सना यूजरच्या फोनपर्यंत पूर्ण प्रवेश मिळतो. यानंतर हॅकर्स यूजरचा वैयक्तिक डेटा जसे की कॉन्टॅक्ट लिस्ट, बँक तपशील आणि इतर संवेदनशील माहिती चोरू शकतात. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये हे चोरटे यूजरच्या फोनचा वापर करून त्याच्या मित्रांकडून पैसे उकळण्यासाठी बनावट मेसेजही पाठवतात. APK म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट (Android Package Kit). हे थर्ड पार्टी अॅप म्हणून वापरले जाते किंवा इंस्टॉल केले जाते. जर तुम्ही प्ले स्टोअरऐवजी इतर कोणत्याही ठिकाणाहून APK डाउनलोड करून इंस्टॉल केली, तर मोबाइलमध्ये व्हायरस आणि स्पॅमिंगचा धोका वाढतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.