इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर तिथे एक पत्रकार परिषद झाली. “देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. त्याचं कारण आल्याला माहीत आहे, आधीचे उपराष्ट्रपती राजीनामा देउन अचानक गायब झाले. त्यानंतर ही निवडणूक होत आहे. इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आमच्या आघाडीकडून सुदर्शनसाहेब उमेवार आहेत. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं. आता देशाला गरज आहे, ती म्हणजे सदसदविवेक बुद्धी जागी ठेऊन संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धी ठेऊन वागणारे उपराष्ट्रपती पाहिजेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत, त्याला अधिक मजबुती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने लढवत आहोत. मी सुदर्शनसाहेबांना धन्यवाद देतो, ते मुंबईत आले, मातोश्रीला आले. आमच्याकडून त्यांना पाठिंबा आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष, त्यांचे नेते एकदिलाने सोबत आहोत. चमत्कार चौकटीत होत नसतो, तो कसाही होऊ शकतो, म्हणून त्याला चमत्कार म्हणतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एनडीएचे खासदार मतदान करतील असा विश्वास
इंडिया आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नाहीय या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “आवश्यक संख्याबळ नसलं, तरी देश विचित्र परिस्थतीत नेला जातोय. त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी आपण थोपवू शकतो, आपली लोकशाही वाचेल. 100-150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, त्या गुलामगिरीत देश जाणार नाही” “संख्याबळावर निवडणूक अवलंबून असती, तर निवडणूक घेण्यात अर्थ नाही. मतदानात गोपनीयता आहे. त्यामुळे ज्यांच्या ह्दयात छुप्यापद्धतीने देशप्रेम आहे, असे एनडीएचे खासदार देशासाठी मतदान करु शकतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या फोनवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
एनडीचे उमेदवार राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता, या प्रश्नावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “आता मतदार यादीतील त्यांचं नाव बघावं लागेल. फडणवीसांनी मला फोन केला, ही गोष्ट सत्य आहे. मला एका गोष्टीच आश्चर्य वाटलं, माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला. त्यांच्यासमोर माझे उमेदवार निवडून आणले. त्यांचा पाठिंबा सुद्धा त्यांना पाहिजे. या विनंतीला काय अर्थ आहे?. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी न मागता पाठिंबा दिला होता. कोणी विनंती केली नव्हती, गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या या पद्धतीला नाकारलं पाहिजे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.