केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कायमच त्यांच्या परखड आणि मिश्किल बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. नागपूर येथे आयोजित महानुभव पंथीय संमेलनात त्यांनी पुन्हा एकदा राजकारण आणि धर्मकारण यांवर आपल्या खास शैलीत भाष्य केले. पंथ आणि संप्रदायांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे. मंत्री जिथे घुसतात, तिथे ते आग लावल्याशिवाय राहत नाहीत,” असे परखड विधान नितीन गडकरींनी केले. धर्मकारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे. कारण राजा नाही धर्म श्रेष्ठ आहे. तुमचं धर्मकारण आहे. ते राजकारणापासून वेगळं ठेवायला हवं, असे नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?“सरकारपासून दूर राहत जा. तुम्ही वारंवार सरकारकडे मागण्या करता. तुम्हाला जितके पाहिजे, तितकी काम करुन घ्या. आमच्याकडे तेवढं आहे. त्या मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायचा आणि काम करुन घ्या. पण आपल्या पंथात आणि संप्रदायात त्यांना घुसून देऊ नका. राजकारण आणि समाजकारण, विकासकारण हे वेगळं आहे. तुमचं धर्मकारण आहे. धर्मकारण आणि समाजकारण याला राजकारणापासून वेगळं ठेवायला हवं. जर राजकारण सुरु झालं तर मग आम्ही इतके घुसतो की तिथे आग लावल्याशिवाय राहत नाही. यानंतर मग महंत आपोआप भांडायला लागतात तू का मी, गादीसाठी भांडण लागते, मग आम्ही स्थगिती देतो, समिती नेमतो आणि दोन्ही महंत आमच्याकडे चकरा मारतात”, असे नितीन गडकरी म्हणाले.
जो लोकांना सर्वात जास्त मूर्ख बनवू शकतो“या वाटेत जाऊ नका. धर्मकारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे. राजा नाही धर्म श्रेष्ठ आहे. तुम्ही धर्माच्या स्थानी आहेत. त्यामुळे स्वामींनी सत्य, अंहिसा, मानवता, शांती, समानता या अनुषंगाने बदल कसा होणार आहे. बोलणे सोपे आहे, करणे कठीण आहे. मी अधिकारी नाही, पण मला अनुभव आहे की मी ज्या क्षेत्रात काम करतो, तिथे मनापासून खरे बोलण्यास मनाई आहे”, असे नितीन गडकरी म्हणाले.
तो सर्वात चांगला नेता बनू शकतो“जिथे हवसे, गवसे, नवसे आहेत आणि जो लोकांना सर्वात जास्त मूर्ख बनवू शकतो, तो सर्वात चांगला नेता बनू शकतो,” असे नितीन गडकरींनी म्हटले. पण शेवटी श्री कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अंतिम निर्णय सत्याचा होतो”, असे सांगत त्यांनी आपल्या बोलण्याचा समारोप केला.