कोकणातून मोठी बातमी समोर आली आहे. अलिकडेच मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर हे आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार खेडेकर हे उद्या (4 सप्टेंबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. खेडेकर यांच्यासोबत त्यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होणार आहेत. वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.
वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणारवैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे महत्वाचे नेते होते. खासकरून खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महत्वाची बाब म्हणजे पक्षाच्या स्थापनेपासून खेडेकर हे राज ठाकरेंच्या सोबत होते. मात्र गेल्या काही काळापासून ते नाराज होते. काही कारणामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर ते भाजपमध्ये किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती.
नितेश राणे काय म्हणाले?नितेश राणे म्हणाले होते की, ‘वैभव खेडेकर यांना मी यापूर्वी ओळखत होतो. गावागावात मनसे पोहचवण्याचे काम त्यांनी केलं. पण त्यांच्या हातात अचानक मनसेमधून बडतर्फ करण्यात पत्र त्यांना पाठवण्यात आलं. वैभव खेडेकर यांना भाजपची ऑफर दिली होती. प्रदेशाध्यक्षांचा संदेश घेऊन वैभव खेडेकरांना भेटायला आलोय’ असं म्हणत 4 सप्टेंबरला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार आहे असल्याची माहिती राणेंनी दिली होती.
वैभव खेडेकरांची प्रतिक्रियाभाजप प्रवेशाबाबत बोलताना वैभव खेडेकर म्हणाले होते की, भारतीय जनता पार्टी ताकद देणार आहे. राज ठाकरेंसाठी माझ्या हृदयातला कोपरा आजही ओला आहे. मी राज ठाकरेंना हृदयातून नाही तर राज ठाकरेंनी त्यांच्या हृदयातून मला बाजूला केलं. माझ्यासोबत माझ्या सर्व समर्थकांची मला साथ आहे. यापुढे भाजपचं काम तेवढ्याच ताकदीने केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बडतर्फ तिन्ही जिल्हाप्रमुख यांच्यासह सर्व समर्थक सोबत आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला कोणतही राजकीय बळ नाही, कार्यकर्त्यांचं प्रेम यामुळेच माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत असं खेडेकर म्हणाले होते.