Theur News : पालकांचा दबाव आणि मुलीचा विरोध; लग्न नको म्हणून घर सोडून गेली तरुणी
esakal September 06, 2025 09:45 AM

- सुनील जगताप

थेऊर - उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असताना आई-वडिलांनी लग्नाचा तगादा लावल्याने बारावी उत्तीर्ण झालेली मुलगी घर सोडून पळून गेल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात १५ ऑगस्टला घडली होती. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्याने तपास करून मुलीला पालकांकडे सुपूर्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी (बदललेले नाव) ही १९ वर्षाची बारावीचे शिक्षण पूर्ण केलेली असून, पालकांनी बारावीनंतर तिचा विवाह करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र साक्षीला अजून पुढे शिकण्याची इच्छा होती. त्यामुळे घरात वादविवाद होत. साक्षीने पुढील शिक्षणासाठी आईवडिलांचे मतपरिवर्तन करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले.

परंतु ते विवाह करून देण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर तिने कोणालाही काहीही न सांगता कायमचेच घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला, आणि साक्षी फोन बंद करून १५ ऑगस्ट पासून गायब झाली.तिच्या आईवडिलांनी लोणी काळभोर, कुंजीरवाडीसह पुणे शहरात शोध घेतला. नातेवाईकांकडे विचारपूस केली.

मात्र, साक्षी कोठेही मिळून आली नाही. आई-वडिलांनी लोणी काळभोर पोलिस ठाणे गाठत साक्षी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलिस हवालदार चंद्रकांत माने, महिला पोलीस अंमलदार कविता साळवे व त्याच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले आणि पथकाला मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

साक्षी घरातून गेल्यापासून तिने तिचा फोन बंद केला होता. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान उभे होते. पोलिस हवालदार संभाजी देवीकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साक्षीची पाठीमागील एक वर्षाचे कॉल (रेकॉर्ड) डाटा काढला. त्यात तिच्या मैत्रिणींची नावे समोर आली. या मैत्रिणीकडे फोन करून चौकशी करता साक्षीची माहिती मिळत नव्हती.

दरम्यान, साक्षीची एक खास मैत्रीण कर्वेनगर परिसरात राहत असून तिच्याकडे फोन नाही. अशी माहिती पोलिसांना मिळाली.मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी कर्वेनगर परिसरात साक्षीचा शोध घेतला. तेव्हा साक्षी ही तिच्या मैत्रिणीच्या येथून काही दिवसापूर्वीच निघून गेल्याची माहिती मिळाली.

साक्षीची तिच्या शिरुर येथील मैत्रिणीकडे चौकशी केली. तेव्हा साक्षी आली होती व ती सकाळीच येथून गेली आहे असे सांगण्यात आले. पोलिसांच्या पथकाला साक्षी ही शिरूर तालुक्यातच दुसऱ्या मैत्रिणीकडे आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली. अनुषंगाने पोलिसांचे पथक शिरूरच्या दिशेने रवाना झाले.

पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतले व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साक्षीला तिच्या आईवडिलांकडे गुरुवारी (ता. ४) सुखरूप सुपूर्त केले.लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, संभाजी देवीकर, विजय जाधव, महिला पोलीस अंमलदार कविता साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.