सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. ठिकठिकाणी रोशनाई दिसते. गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. महाराष्ट्रातील एका गावात चार दशकांहून अधिक काळापासून एक अनोखा गणेशोत्सव साजरा होत आहे. या गावात मशिदीत गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केली जाते. स्थानिक गणेश मंडळाचे संस्थापकांनी ‘पीटीआय’ला याबाबत सांगितले आहे. इतरत्र धार्मिक तणाव असतानाही सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील रहिवाशांवर त्याचा कधीच परिणाम झाला नाही असे ते म्हणाले.
सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या गावात हा अनोखा उत्सव पाहायला मिळतो. येथे गणोत्सवासाठी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी या अनोख्या गणेश उत्सवाबद्दल बोलताना सांगितले की, या गावाची लोकसंख्या सुमारे 15,000 आहे. त्यामध्ये मुस्लिम समुदायातील 100 कुटुंबांचा समावेश आहे. मुस्लिम बांधवही या मंडळाचे सदस्य आहेत. ते ‘प्रसाद’ बनवणे, पूजा-अर्चना करणे आणि उत्सवाच्या तयारीत मदत करतात.
वाचा: भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान मुंबईत तासभर का थांबवले? पुण्याला जाण्याची का हवी होती परवानगी?
1980 मध्ये सुरू झाली परंपरा
पाटील यांनी सांगितले की, ही परंपरा 1980 मध्ये सुरू झाली, जेव्हा मुसळधार पावसामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील मशिदीत गणपतीची मूर्ती नेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ही परंपरा शांततेने सुरू आहे आणि त्यात मुस्लिम समुदायाचा सक्रिय सहभाग आहे. गावातील झुंझार चौकात ‘न्यू गणेश तरुण मंडळा’ची स्थापना 1980 मध्ये झाली. मूर्ती 10 दिवसांच्या उत्सवासाठी मशिदीत ठेवली जाते आणि नंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्सवाच्या समारोपात स्थानिक जलाशयात विसर्जित केली जाते.
गणेश चतुर्थीला मुस्लिमांनी ‘कुर्बानी’ टाळली
पाटील यांनी सांगितले की, एकदा बकरी ईद आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आली होती. तेव्हा मुस्लिमांनी आपला सण फक्त नमाज पढण करुन साजरा केला आणि ‘कुर्बानी’ दिली नाही. त्यांनी सांगितले की, ते हिंदू सणांच्या काळात मांस खाणे टाळतात. त्यांनी सांगितले की, संपूर्ण देशाने येथील सामाजिक आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणापासून प्रेरणा घ्यावी. दरवर्षी गणेशमूर्तीच्या ‘प्राणप्रतिष्ठे’साठी स्थानिक पोलिस आणि तहसीलदार यांना आमंत्रित केले जाते.