मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मात्र, आझाद मैदानासोबतच सीएसएमटीच्या बाहेर देखील आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न उपस्थित राहिलाय. त्यामध्येच वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. मराठा समाजाच्या आंदोलकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत. जे.जे उड्डाणपुला मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या मुंबई पोलिस आयुक्तालयामार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाऊ दिले जाणार. तर मेट्रो जंक्शन ते सीएसएमटीच्या दिशेने येणारा आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगरपालिका मार्ग हाही बंद ठेवला जाणार आहे. शिवाय हजारीमल सोमानी रोड जो फॅशनस्ट्रीटहून सीएसएमटीकडे येणारा आणि आझाद मैदानला लागून असलेला मार्गही बंद ठेवला जाणार आहे.
हुतात्मा चौकाहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीनड्राईव्ह जंक्शन हे मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दोन दिवसांपासून मराठा आंदोलकांनी फ्री वे वर वाहने उभी केल्याने बंद असलेला फ्री वे वाहतूकीसाठी खुला राहणार आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतूकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीनड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक ही देण्यात आली आहे.
वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक या दोन वाहतूक पोलिस चौक्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील दोन दिवसांपासून मराठा आंदोलक हे महापालिकेच्या इमारतीसमोरील मुख्य रस्त्यावर जमत आहेत आणि यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा या बघायला मिळत आहेत. यासोबतच सीएसएमटीस्थानकातही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक थांबवत आहेत. जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चाैथा दिवस आहे.