खराब रस्त्यांविरोधात
काँग्रेसचे आंदोलन
रत्नागिरी, ता. ३१ : शिरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पटवर्धन वाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करा, अन्यथा ८ सप्टेंबर रोजी रास्ता रोको करू, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिरगाव ग्रामपंचायत ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या परिसरातील रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे. वीज, पाणी या समस्या जैसे थे आहेत. हे प्रश्न सोडवले जात नाहीत, तोपर्यंत काँग्रेसने रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. ‘आम्ही कर भरतो, आमचे पैसे कुठे वापरले जातात, हे आम्हाला जाणून घ्यावे लागेल,’ असे काँग्रेस पदाधिकारी आतिफ साखरकर, शाहरुख वागळे, इरफान होडेकर, जैनुल सारंग, फहीम फणसोपकर, शेहबाज होडेकर, आकिब काझी यांनी स्पष्ट केले आहे.