भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इंग्लंडला 5 सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचं प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजकडे लक्ष लागून आहे. एशेस सीरिजमध्ये आतापर्यंत कायम इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला जवळपास 3 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र त्यानंतरही या मालिकेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ऑस्ट्रेलियाला या मालिकेत नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्या शिवाय खेळण्यासाठी उतरावं लागू शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅट कमिन्स याला फिटनेसच्या समस्येशी झगडावं लागत आहे. तसेच पॅटचं एशेस सीरिजआधी फिट होणं अवघड असल्याचं म्हटलं जात आहे.
इंग्लंडमधील द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, कमिन्सला पाठीदुखीचा त्रास आहे. पॅटची काही दिवसांपूर्वी टेस्ट करण्यात आली होती. पॅट या पाठीदुखीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. रिपोर्ट्सनुसार, पॅटच्या या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. पॅटला दुखापतीमुळे या मालिकेतील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागू शकतं. तसेच पॅटची काही दिवसांनी टेस्ट केली जाईल. त्या आधारावर पॅटबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
रिपोर्ट्सनुसार, पॅटच्या फिटनेसबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे. एशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर पॅटला ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 2 मालिकांमधून विश्रांती दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर महिन्यात 1 तारखेपासून न्यूझीलंड विरुद्ध टी 20I मालिका खेळणार आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे.
पहिला सामना, 21 ते 25 नोव्हेंबर, पर्थ
दुसरा सामना, 4 ते 8 डिसेंबर, ब्रिस्बेन
तिसरा सामना, 17 ते 21 डिसेंबर, एडलेड
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवा सामना, 4 ते 8 जानेवारी, सिडनी
दरम्यान यंदा एशेस सीरिज ऑस्ट्रेलियात होणार आहे. उभयसंघात 21 नोव्हेंबर ते 8 जानेवारी दरम्यान एकूण 5 कसोटी सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांची ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील दुसरी मालिका असणार आहे.