बांगलादेश क्रिकेट टीम आशिया कप 2025 स्पर्धेआधी मायदेशात नेदरलँड्स विरुद्ध 3 सामन्याची टी 20i मालिका खेळत आहे. बांगलादेशने 1 सप्टेंबरला सलग दुसरा टी 20i सामना जिंकला आहे. बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे साल्हेट येथे आयोजन करण्यात आलं होतं. बांगलादेशने हा सामना सहज जिंकला. नेदरलँड्सने बांगलादेशसमोर 104 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 41 चेंडूआधी आणि 1 विकेटसच्या मोबदल्यात पूर्ण केलं. बांगलादेशने 13.1 ओव्हरमध्ये 104 धावा केल्या आणि 9 विकेट्सने सामना जिंकला. बांगलादेशने यासह मालिकाही जिकंली. बांगलादेशने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
परवेझ हुसैन इमोन, तंझिद हसन तमिम आणि कॅप्टन लिटन दास या तिघांनीच बांगलादेशला सहज विजय मिळवून दिला. परवेझ आणि तांझिद या सलामी जोडीने 40 धावांची भागीदारी केली. परवेझच्या रुपात बांगलादेशने पहिली विकेट गमावली. परवेझने 21 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. त्यानंतर तांझिद आणि लिटन या जोडीनेच बांगलादेशला विजयी केलं. तांझिद आणि लिटन दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 64 धावांची भागीदारी केली. तांझिदने बांगलादेशससाठी सर्वाधिक धावांचं योगदान गिलं. तांझिदने 40 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 54 रन्स केल्या. तर लिटनने 100 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 18 धावा केल्या.
त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून नेदरलँड्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र नेदरलँड्सच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. नेदरलँड्सच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. नेदरलँड्ससाठी फक्त दोघांनाच 20 पार मजल मारता आली. विक्रमजीत सिंह याने 24 धावा जोडल्या. तर आर्यन दत्त याने अखेरच्या क्षणी 30 धावांची निर्णायक खेळी केली. त्यामुळे नेदरलँड्सला 100 पार पोहचता आलं. मात्र इतर फलंदाजांनी शरणागती पत्कारल्याने नेदरलँड्सचा डाव 17.3 ओव्हरमध्ये 103 धावांवर आटोपला. बांगलादेशसाठी नसुम अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तंझीम साकीब आणि महेदी हसन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा बुधवारी 3 सप्टेंबरला होणार आहे. बांगलादेशकडे हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर नेदरलँड्ससमोर शेवट गोड करुन बांगलादेशला क्लिन स्वीप करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.