Manoj Jarange Patil Mumbai Protest : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. समस्त मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. याच मागणीला घेऊन ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या या मागणीनंतर आता ओबीसी संघटना तसेच ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये. अन्यथा आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ असा थेट इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता मनोज जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मी भुजबळ यांना ग्राह्यच धरत नाहीजरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर जरांगे यांनी आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांना संबोधित केले तसेच माध्यम प्रतिनिधींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी पत्रकारांनी जरांगे यांना भुजबळ यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना मी भुजबळ यांना ग्राह्यच धरत नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. हे अंतिम सत्य असून यावर मी ठाम आहे. भुजबळ यांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, असा थेट हल्लाबोल जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केला.
मला जातीला जिंकून द्यायचे आहे, त्यामुळे…तसेच, आंदोलकांनी घालून दिलेले सर्व नियम मोडले आहेत, असा दावा महाधिवक्त्यांनी न्यायालयात केला होता. त्यांत आता जरांगे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मुंबईचे रस्ते मोकळे करा. गाड्या रस्त्यावर लावू नका. मैदानावर नेऊन गाड्या लावा आणि जाऊन झोपा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तसेच मला माझ्या जातीला जिंकून द्यायचे आहे. त्यामुळे जातीची मान खाली झुकेल असं काहीही करू नका. तुमच्याकडून होत नसेल तर परत गावी जा, असे खडे बोल जरांगे यांनी मराठा तरुणांना सुनावले आहेत.
भुजबळ यांची भूमिका काय?दरम्यान, छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. तसे झाल्यास आम्हीदेखील लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ, असे भुजबळ म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आता प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आंदोलन केले जाईल, असेही जाहीर केले आहे.