मराठा आंदोलनात पत्रकारांसोबत झालेल्या गैरवर्तनाचा ब्लॅक पँथरने व्यक्त केला निषेध
esakal September 02, 2025 07:45 AM

ब्लॅक पँथरच्या वतीने पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : मुंबईमधील आझाद मैदान येथे चालू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे वृत्तांकन करत असताना काही पत्रकार व कॅमेरामन यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर होणारा हा हल्ला केवळ निंदनीय नाही तर लोकशाही व्यवस्थेलाच बाधा आणणारा असल्याचे सांगत ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ब्लॅक पँथर पक्षाचे मुंबई प्रदेश महासचिव अजय कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पत्रकार आणि कॅमेरामन हे सत्य घटनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्यावर झालेल्या अशा प्रकारच्या गैरवर्तनामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येते. हे कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही. ब्लॅक पँथर पक्ष हा सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांसाठी लढणारा राजकीय पक्ष आहे. म्हणूनच या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत महाराष्ट्रातील पत्रकार व माध्यमकर्मी यांची सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने या घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींना ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत. पत्रकार बांधव सुरक्षित व निर्भय वातावरणात आपले कर्तव्य पार पाडतील. यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे अजय कांबळे यांनी या वेळी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.