माणगावात ज्येष्ठा गौराईचे आगमन;
महिलांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण
माणगाव, ता. १ (वार्ताहर) ः दीड दिवसाच्या गणरायांच्या विसर्जनानंतर माणगाव तालुक्यात रविवारी संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठा गौराईचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. या आगमनामुळे महिलावर्गामध्ये चैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र उत्सवाचा माहोल पाहायला मिळत आहे.
स्थानिक परंपरेनुसार माणगाव तालुक्यातील सासर आणि माहेरवाशिणी महिलांनी रविवारी जंगल परिसरात जाऊन तेरडा या फुलझाडाचे पूजन केले. या पूजनानंतर तेरड्याच्या डहाळ्यांवर गौराईसाठी मुकुट चढवून डहाळ्यांना गावातील मंदिरात आणले जाते. मंदिरात पूजन करून गौराईचे स्वागत केले जाते आणि नंतर तिला मोठ्या थाटामाटात घरी नेऊन प्राणप्रतिष्ठा केली जाते. या पारंपरिक विधीमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळतो, ज्यातून निसर्गाशी नाळ जोडणारी जुनी परंपरा आजही जपली जात असल्याचे दिसून येते. सोमवारी महिलांनी उपवास धरून गौराईचे मनोभावे पूजन केले. पूजनानंतर संध्याकाळी महिलांनी रात्रभर गौराईच्या गाण्यांचा आणि भजनांचा आस्वाद घेतला. नाच-गाण्याच्या कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक झाले होते. अनेक ठिकाणी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावून या सांस्कृतिक सोहळ्याला रंगत आणली. यावर्षी गणेशोत्सव सात दिवसांचा असल्याने मंगळवारी गणरायाबरोबरच गौराईचेही विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी तयारी सुरू झाली असून, महिलांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. गौराई पूजनाचा हा पारंपरिक उत्सव महिलांसाठी एकात्मता, मैत्री आणि आनंदाचा सोहळा मानला जातो.