रुंदीकरणाला विजेचा अडथळा
घोडबंदर मार्गावरील विद्युत खांब, जनित्रे हटवण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत
ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) ः वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या ठाण्यातील घोडबंदर महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात विविध अडथळे येत आहेत. रस्त्याच्या मध्य भागातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, विद्युत खांब आणि विद्युत जनित्रे दूर करण्याकरिता प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार असून, त्याशिवाय या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार नाही. ठाणे पालिकेकडून हे अडथळे दूर करून युटिलिटी डकमधून विद्युत केबल टाकण्याचे काम केले जाणार आहे. वीज वितरण कंपनीकडून हे अडथळे दूर करण्याकरिता हिरवा कंदील दाखवण्यात आला असून, पालिकेनेही युटिलिटी डक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
घोडबंदर महामार्ग जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून उरण येथील न्हावा-शेवा बंदरातून मोठ्या प्रमाणात गुजरातकडे जड-अवजड वाहनांमधून मालाची वाहतूक केली जाते. मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. मार्गावरून होणाऱ्या वाहनांची वाढती संख्या पाहता त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. परंतु सेवारस्ता आणि मुख्य रस्त्याच्या मध्य भागात दोन्ही बाजूला वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या वाहिन्या अडथळा ठरू लागल्या आहेत. या वाहिन्या जुन्या झाल्या असून, लोखंडी खांब गंजलेले आहेत. त्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
विद्युत वाहिन्यांसोबतच सेवा रस्त्यावर असलेले उच्च दाबाची विद्युत जनित्रेदेखील मूळ जागेवरून हटवावी लागणार आहेत. रस्त्याच्या मधोमध आलेले हे अडथळे बाजूला करण्याची मोठी जबाबदारी वीज वितरण कंपनी आणि ठाणे पालिकेच्या खांद्यावर आली असल्याने दोघांकडूनही समन्वयाने ते बाजूला काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या देखरेखीखाली ही कामे ठाणे महापालिकेच्या निधीमधून होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
सेवा रस्तेदेखील मुख्य रस्त्यामध्ये विलीन
ठाणे पालिका आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्याचे काम केले जात आहे. वडाळा येथून येणारी मेट्रो प्रवासी वाहतूक सेवादेखील येत्या दोन वर्षांत सुरू होणार आहे. यामुळे मार्गावरील दोन्ही बाजूंकडील सेवा रस्तेदेखील मुख्य रस्त्यामध्ये विलीन करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील रस्ता आणखी रुंद होणार असून, वाहतूक कोंडी नियंत्रणात येणार आहे.
घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाचे नियोजन साफ चुकले आहे. रुंदीकरण करताना संबंधित यंत्रणेने योग्य नियोजन केले नसून, त्यामुळे या कामाकरिता प्रचंड प्रमाणात नाहकपणे खर्च होत आहे. रस्ता रुंदीकरण्याच्या आधीच कामे होणे अपेक्षित होते. परंतु आता या कामाकरिता मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार नाही. सेवा रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होणार आहे.
- नरेश मणेरा, माजी उपमहापौर, ठाणे