गणेशोत्सवात पालिका निवडणुकांचे पडघम
esakal September 02, 2025 07:45 AM

गणेशोत्सवात पालिका निवडणुकांचे पडघम
इच्छुक उमेदवारांच्या ठिकठिकाणी कमानी; बॅनरमधून शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल, ता. १ (बातमीदार) : ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी यासंदर्भात निकाल देत येत्या चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्यभर हालचाली सुरू झालेल्या आहेत. पनवेल महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर याचे प्रतिबिंब जाणवू लागले आहे. उत्सवाची संधी साधून इच्छुक उमेदवारांनी गणेशभक्तांवर बॅनर आणि स्वागत कामानीद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांसमोर दिसणाऱ्या राजकीय फलकांमुळे निवडणुकीचे पडघम आणि वातावरणनिर्मिती होऊ लागली आहे. पनवेल पालिकेचे मुदत संपत आली आहे. डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी आपणास विधानसभेची रणधुमाळी अनुभवायला मिळाली. राज्यात महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाल्यामुळे त्यामुळे पालिका निवडणुकांमध्येही घटक पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पनवेल पालिका मतदारसंघातसुद्धा वातावरण फार वेगळे नाही. नवोदित असलेल्या पनवेल महापालिकेमध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला होता. ग्रामीण भागातही भाजपची पूर्वीच्या तुलनेत पकड मजबूत झालेली आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिबिंब सध्या गणेशोत्सवावर येत आहे. पनवेल ग्रामीण भागासह वसाहतीमधून राजकीय पुढाऱ्यांचे बॅनरबाजी दिसून येत आहे. अगोदर दहीहंडी आणि आता गणेशोत्सवात त्यांच्याकडून शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स आणि कमानी लावण्यात आल्या आहेत.

इच्छुकांची यादी मोठी
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादीचे दोन्ही गट, तसेच कॉलनी फोरमच्या संस्थापिका लीना गरड यांचेसुद्धा फलक ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहेत. कळंबोली, कामोठ्यात शेकापने विशेष भर दिला आहे. खारघरमध्येसुद्धा बॅनर झळकले आहेत. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट)सुद्धा मागे राहिली नाही. विधानसभेला इच्छुक असणाऱ्या लीना गरड यांच्या नावाच्या कमानी कळंबोलीसह सिडको वसाहतीत दिसून येत आहेत. त्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर याच पक्षाचे पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचेसुद्धा भावी आमदार म्हणून फलक लागले आहेत. घरतसुद्धा इच्छुकांच्या यादीमध्ये असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या बॅनरबाजीत तेसुद्धा मागे राहिले नाहीत. गणेशोत्सवानंतर आता लगेचच नवरात्री, दसरा आणि दिवाळी सण येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची लगीनघाई सुरू आहे.


जिकडे-तिकडे भाजपच भाजप
पनवेल विधानसभा मतदारसंघामधून आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा बहुमताने निवडून आलेले आहेत. या वेळी पनवेल महापालिकेवर भाजपची सत्ता येणार असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षातील दिग्गज नेत्यांचा माजी नगरसेवकांचा बीजेपीमध्ये सामील होण्याचा ओघ वाढला आहे. तसेच नवोदित व इच्छुकांचे दहीहंडी आणि गणेशोत्सवात प्रतिबिंब उमटल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्याचबरोबर वेगवेगळ्या सोसायट्यांसमोर बॅनर आणि फलकांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. या माध्यमातून त्यांनी आपला नियोजनबद्ध प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत चांगलाच राजकीय फड रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.