दुर्दैवी घटना! 'सोलापूरमध्ये घरात गॅस लिकेज; दोन चिमुकल्यांचा मृत्यू', बेशुद्ध तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक
esakal September 02, 2025 04:45 AM

सोलापूर : पाच फूट रुंद आणि दहा फूट लांबीच्या छोट्याशा खोलीत सिलिंडरमधील गॅस लिकेज झाला. घराला खिडकी नाही, दरवाजाही बंद असल्याने तो गॅस शरीरात गेल्याने घरातील पाचजण बेशुद्ध पडले होते. सर्वांच्या तोंडाला फेस आला होता. त्यापैकी दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर उर्वरित तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (ता. ३१) सकाळी साडेअकराच्या सुमारास नळ बझार चौकात उघडकीस आली.

नळ बझार चौकाजवळील युवराज बलरामवाले (वय ३३) हे शनिवारी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन घरी परतले होते. त्यांची आई विमल मोहनसिंग (वय ५२), पत्नी रंजना (वय २५), मुलगा हर्षराज (वय ५) व मुलगी अक्षता (वय ४) हे सगळेजण रात्री जेवण करून झोपी गेले. झोपताना गॅस सिलिंडरचा बर्नर चुकून सुरूच राहिला होता. सगळेजण गाढ झोपेत असल्याने हळूहळू संपूर्ण घरात गॅस पसरला. गॅस बाहेर जाण्यासाठी मोकळी जागा नसल्याने सगळेजण झोपेतच बेशुद्ध पडले होते.

रविवारी (ता. ३१) सकाळी साडेअकरा वाजल्यानंतरही घरातून कोणीच बाहेर कसे काय आले नाहीत म्हणून कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावला. पण, आतून काहीही आवाज येत नव्हता. एकजण घरावर चढला व त्याने पत्रा उचकटून पाहिले, त्यावेळी घरातील सगळेजण निपचित पडल्याचे दिसले. वालेंच्या घराजवळ गर्दी जमली होती. सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. बंडगर त्या ठिकाणी पोचले. सर्वांनी मिळून घर उघडले व त्यांना सिव्हिल रुग्णालयात हलविले. रविवारी रात्री हर्षराज व अक्षता यांचा मृत्यू झाला. त्यांची आजी विमल, आई रंजना व वडील युवराज यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Karad Crime: 'रेकॉर्डवरील ३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई'; कऱ्हाडला गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट घराची रचना अन् जागा जीवघेणी

नळ बझार परिसरातील बलरामवाले कुटुंबीयांच्या घराची लांबी दहा फूट आणि रुंदी पाच फूट, त्या घरातच किचन होते. घराचे छत तथा पत्रे अवघ्या आठ फुटांवर आहेत. तेवढ्या छोट्या खोलीत दररोज कुटुंबातील पाचजण झोपायचे. घराला एक दरवाजा, तोही एकदम पॅकबंद आहे. घराला कोणतीही खिडकी नाही, अशी त्या घराची रचना आहे. छोटे घर, घरातील रचना, सदस्य संख्या पाहून पोलिसही चक्रावले.

पत्रा उचकटून आत जाऊन काढली कडी

रस्त्यालगत असलेल्या बलरामवाले यांचे घर बाहेरून नव्हे आतून बंद कसे काय म्हणून गल्लीतील एकाने दरवाजा ठोठावला. एकजण घरावर चढला आणि पत्रा उचकटला. त्यानंतर घरातील सगळेच बेशुद्ध पडल्याचे पाहून त्या व्यक्तीने आत उडी मारून कडी उघडली. त्यानंतर तातडीने घरातील बेशुद्ध पाचही जणांना उपचारासाठी जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, असे सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.