'चूडी जो खनके हाथों में...'
esakal September 02, 2025 04:45 PM

सुषमा सोळंके

बोनस मिळाला तशी दिवाळी जवळ आल्याची चाहूल लागली. ‘‘मला दिवाळीला भारी साडी पाहिजे हो,’’ मी ऐलान केलं. ‘‘घे हवी तितकी भारी’’ यांनीही कुबेराचा अकाउंटट असल्यासारखी एकदम सहमती दर्शवली. मग आम्ही दोघंही दुपारी साडीखरेदीच्या मोहीमेला निघालो. माझ्या स्त्रीधर्माला जागून दोन-तीन दुकाने व अनेक साड्यांची उलटापालट केल्यानंतर एका भारी (?) साडीची खरेदी झाली. तोपर्यंत साहेब पार वैतागून गेले होते. सगळ्याच साड्यांना ‘मस्त, मस्त’ म्हणून मी निवडलेल्या साडीला एकदम मस्त म्हणून त्यांनी पसंती दर्शविली आणि बिल देऊन एकदाचे आम्ही मोहीम फत्ते झाल्याच्या आनंदात घरी निघालो.

एका हातात पर्स एका हातात ती ‘भारी’ साडी घेऊन मी चालत असताना एकदम एका ज्वेलर्सच्या दुकानासमोर थबकून उभे राहिले. सोन्याच्या बांगड्यांची कितीतरी डिझाइन्स! भानच हरपून गेलं माझं. या साडीवर या बांगड्या किती छान शोभतील नाही?... मी मनातल्या मनात म्हणाले. किती वेळ उभी होते कोण जाणे. पण हे पुढे जाऊन, बायको मागे नाही गर्दीत हरवली की काय म्हणून कावरे-बावरे होऊन मला शोधत मागे आले.

मी दुकानासमोरच. हे रागावले. तेव्हा मी त्यांना त्या सुंदर बांगड्या दाखवल्या. तसे ते म्हणाले, ‘‘मग चल दुकानात आणि घे.’’ ‘‘काय? अहो, पालकाची जुडी का आहे ती? किती लाखांच्या असतील? नको, नको चला घरी...’’, मी यांना परतवलं. घरी आल्यावर साडीचं कौतुक आणि यांचं माझ्याकडेही न पाहता ‘मस्त, मस्त’ चालूच होतं. गुजरातवरून मी अशाच आर्टिफिशियल बांगड्या आणल्या होत्या. त्याच घालू या म्हणून मी मनाला समजावलं. दुसरे दिवशी कपाटात पाहिलं, तर त्यातली एक बांगडी गायब. ‘‘अहो, यातली एक बांगडी कुठे गेली?’’ ‘‘आता तुझ्या बांगड्याही मला माहीत काय?’’ म्हणत हे निघून गेले.

दिवाळी आली, पाडवा आला तसं त्यांनी एक गिफ्ट माझ्या हातात दिलं. उघडून पाहिले तर त्याच बांगड्या; पण सोन्याच्या. हे म्हणाले, ‘‘घाल आताच.’’ बांगड्या घालताच मुलगी म्हणाली, ‘‘खूप छान दिसतात गं आई.’’ मी भांबावून म्हणाले, ‘‘अगं पण पैसे?’’. ‘‘असू दे गं, जन्मभर हिशेबच करणार आहे का?’’

‘‘पण किती परफेक्ट माप गं,’’ मी अगदी आश्चर्यचकित झाले. ‘‘अगं, आई तुझी ते बांगडी हरवली होती नं ती आम्हीच नेली होती मापासाठी.’’ बाई गं किती हुशार बाप-लेक. बांगड्या घालून मी यांच्यापुढे हात केले आणि विचारलं, ‘‘कशा दिसतात हो?’’ हे अगदी मनापासून म्हणाले, ‘‘मस्तच.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.