छोटे वारकरीही आंदोलनात सहभागी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. या आंदोलनामध्ये सासवड येथील श्री माउली बाल संस्कार वारकरी संस्थेचे छोटे वारकरीही सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले.
स्वप्नील टाळणे महाराज यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या पथकात बाल वारकऱ्यांनी सहभाग घेतला. टाळ, मृदंगाच्या गजरात आणि अभंग गात त्यांनी सीएसएमटी परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलनात सहभाग नोंदवला. ‘आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईत आलो आहोत. राज्यभरातील अनेक वारकरी संघटना व मंडळे या आंदोलनात उतरतील. सरकार आज जरी चालढकल करीत असले तरी आज ना उद्या त्यांना आमची दखल घ्यावीच लागेल,’ असा विश्वास या छोट्या वारकऱ्यांनी व्यक्त केला.
आम्ही पंढरीला जातो तसे आता आंदोलनात आलो आहोत. आमचे दादा न्याय मागत आहेत, म्हणून आम्हीही टाळमृदंग घेऊन आलो.
- पूर्वा पारे, वारकरी
आमच्या अभंगातून सरकारने आमचा आवाज ऐकावा, एवढेच आम्हाला हवे आहे; नाहीतर आम्हाला आमचा आवाजही वाढवता येतो हे सरकारने लक्षात ठेवावे.
- वैष्णवी गवारी, वारकरी
मनोज जरांगे हे आमच्यासाठी उपोषण करीत आहेत. हे आमचे छोटे पथक आहे, पण आमचा आवाज मोठा आहे.
- श्री भिसे, वारकरी
आम्ही वारकरी, आम्ही शिस्तीत चालतो. आता या आंदोलनातही शिस्तीत उभे राहून आम्ही आमचे कर्तव्य करीत आहोत. सरकारने आमच्या भावना समजून घ्याव्यात, ही विनंती.
- स्वप्नील टाळणे, वारकरी महाराज