मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषणासाठी आझाद मैदानात बसले आहेत. आता या आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनोज जरांगे यांच्यात तणाव वाढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीने ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, आंदोलकांना दक्षिण मुंबईतील सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि इतर भागांतून बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या कोअर कमिटी सदस्यांना नोटीस बजावली आहे.
या नोटीसमध्ये, आंदोलनासाठी दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, हे आंदोलन फक्त एक दिवसासाठी आणि ठराविक वेळेसाठी होतं. मात्र, मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु ठेवले. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
आंदोलनासाठी परवानगी नाहीआता पोलिसांनी बजावलेली ही नोटीस मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलेली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी या नोटीसवर सही केलेली नाही. त्यांच्यासोबतच कोअर कमिटीच्या सदस्यांनीही ही नोटीस नाकारली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५ आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन केलं नाही. त्यामुळे, यापुढे आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात येत असून, त्यांनी आझाद मैदान तात्काळ रिकामे करावे, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाहीदरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली. मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने नामवंत वकील सतिश माने शिंदे हे मैदानात उतरले आहेत. माने शिंदे हे उच्च न्यायालयात आंदोलनांची बाजू मांडत असून सुरुवातीलाच आंदोलकांकडून झालेल्या गैरकृत्याबद्दल न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. या सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश आंदोलकांना दिले आहेत. तसेच, पोलिसांनाही कायद्यानुसार कारवाई करण्याचे बजावले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची दिसून येत आहे.