बुलडाणा : ‘‘भाजपच्या जबाबदार मंत्र्यांच्या वक्तव्यावरून त्यांना हे मराठा आरक्षण झटकून टाकायचे असल्याचे दिसते. त्यांना निर्णय घेता येत नसेल तर त्यांनी पायउतार व्हावे,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केली आहे.
ते म्हणाले, ‘‘मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे आकस्मिक नाही. तीन महिन्यांपासून त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. जर तुम्हाला तीन महिन्यात निर्णय घेता येत नाही तर या सरकारने आंदोलनाच्या तीन दिवसांत निर्णय घ्यावा, ही भाबडी आशा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना हा प्रश्न जटिल करायचा आहे. त्यांना राज्यामध्ये तणाव निर्माण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे. त्यांनी स्थापन केलेल्या समितीलाही निर्णय घेता येत नसेल तर त्यांनी त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे? हे देखील स्पष्ट केले पाहिजे.’’
तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या पायाजवळ शपथ घेऊन मागील आंदोलन थांबविले होते. त्यांची त्यावेळी आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका होती, मग आता त्यांनी भूमिका बदलली का? हे जाहीर करावे, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.
वडिलांकडून माहिती घ्यानीतेश राणे यांच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, त्यांचे वडील नारायण राणे हे देखील एका समितीचे सदस्य होते. नीतेश यांनी आधी वडिलांकडे जाऊन माहिती करून घ्यावी. तर अशी हास्यास्पद विधाने करावी लागणार नाहीत.