सुतारवाडी-कोलाड परिसरात मोबाईल रेंज गायब; ग्राहक नाराज
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक समस्यांमुळे डिजिटल व्यवहार ठप्प
रोहा, ता. २ (बातमीदार) : सुतारवाडी आणि कोलाड परिसरात खासगी दूरसंचार कंपनीच्या मोबाईल नेटवर्कमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील संबंधित कंपनीच्या सिमधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून नेटवर्कची रेंज सतत गायब होत असल्याने अनेक नागरिकांना मोबाईल कॉल, इंटरनेट सेवा व ऑनलाइन व्यवहारात अडचणी येत आहेत.
संबंधित कंपनीची रेंज काही वेळा उपलब्ध होते; मात्र काही मिनिटांत अचानक गायब होते, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरात आलेल्या ग्रामस्थांना आणि पर्यटकांना परतीच्या प्रवासासाठी रिझर्वेशन करणे, पैसे ट्रान्स्फर करणे, ऑनलाइन खरेदी व आर्थिक व्यवहार करणे अशक्य झाले आहे. ही नेटवर्कची समस्या विशेषतः सुतारवाडी-कोलाड परिसरात सतत वाढत आहे. नेटवर्क नसल्याने मोबाइलवरून संपर्क साधणे कठीण झाले आहे, तसेच गाइडलाइन किंवा महत्त्वाच्या माहितीचे आदान-प्रदान थांबले आहे. यामुळे केंद्रीय व स्थानिक सेवांचा वापर करणाऱ्या नागरिकांचा दिवसभरचा वेळ वाया जात आहे, असा संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांच्या डिजिटल व्यवहारावरही परिणाम होत आहे. बँकिंग, रक्कम ट्रान्स्फर, ऑनलाइन रिझर्वेशन, ई-कॉमर्स आणि शैक्षणिक कामे या सगळ्यांवर परिणाम होत असल्याने, ग्राहकांची नाराजी अधिकच वाढली आहे. अनेकांनी तक्रारी जिओच्या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये दाखल केल्या असल्या तरी अद्याप सध्याची तातडीची सुधारणा होत नसल्याने लोकांच्या अपेक्षा खोट्या ठरत आहेत.