छंद, करिअरची सांगड घाला
उपप्राचार्य गोसावी ः सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : प्रत्येकाने आपले छंद जोपासले पाहिजेत. आनंदासाठी छंद आणि करिअर या दोघांचीही आपल्या जीवनात सांगड घालता आली पाहिजे. अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक मंडळ हे विद्यार्थी घडवणारे केंद्र आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक उपक्रमांतील सहभाग वाढवावा, असे आवाहन अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी म्हणाले.
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन व देशभक्तिपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बहारदार देशभक्तिपर गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर व सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा. सीमा फळणीकर उपस्थित होते.
देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा उद्घाटनानंतर झाली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेसाठी प्रा. भूषण केळकर व प्रा. कश्मिरा सावंत यांनी परीक्षण केले. गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयातील बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मधील विद्यार्थ्यांनी प्रा. हरीश केळकर यांच्या संगीत संयोजनाखाली स्पर्धकांना संगीत साथ केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वराधीश ग्रुप (रक्षीण्यास चालले जवान माय भूमीचे); द्वितीय क्रमांक स्वातंत्र्य स्वर ग्रुप (जयोस्तुते जयोस्तुते) व तृतीय क्रमांक जयतू भारत ग्रुप (जयतु भारतम्) यासर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. हृषिकेश नागवेकर यांनी केले. प्रा. प्रीती टिकेकर यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. आभार प्रा. माधवी लेले यांनी मानले.