नाशिक: आंबे (ता. पेठ) ग्रामपंचायतीच्या कामातील भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत ग्रामपंचायत विभागाने किरकोळ कारवाई केली. अखेर राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः विभागप्रमुखांना दूरध्वनी करून त्यांना खडेबोल सुनावले. ‘काम करणे शक्य नसेल तर लोकांना खोटी आश्वासने देऊ नका,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मंत्री जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आल्याचे कळताच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी फाइल घेऊन धावतच त्यांच्यासमोर पोचले. या वेळी संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबे ग्रामपंचायतीने केलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरी बांधकाम व सार्वजनिक शौचालय दुरुस्ती कामात भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तत्कालीन ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी करून ग्रामसेवक व सरपंच दोषी असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर कारवाई अपेक्षित असताना ग्रामपंचायतीने केवळ १ ते ४ भरून घेणे आणि सरपंचांविरोधात कलम ३९ (१) अंतर्गत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवणे यापलीकडे कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी पेठ पंचायत समितीसमोर तसेच १८ ऑगस्टला जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले. त्या वेळी कारवाईचे आश्वासन दिले गेले; मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.
सोमवारी (ता. १) मंत्री झिरवाळ जिल्हा परिषदेत आल्यावर ग्रामस्थांनी ही तक्रार मांडली. विभागप्रमुख उपस्थित नसल्याने मंत्र्यांनी दूरध्वनीवरूनच त्यांना धारेवर धरले. ‘तुम्हाला काम करणे शक्य नसेल, तर लोकांना खोटी आश्वासने कशाला देता?’ असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. मंत्री थेट मिनी मंत्रालयात पोहोचले असा संदेश मिळताच अधिकारी फाइल घेऊन तत्काळ खाली उतरले.
Chandrashekhar Bawankule : शहरातील गरीब नागरिकांना मिळतील मालकी हक्काचे पट्टे : चंद्रशेखर बावनकुळे; न्यायालयाच्या निर्णयाने विकासग्रामस्थांची नाराजी
आंबे गावातील ग्रामस्थांनी मंत्री झिरवाळ यांच्यासमोर ग्रामपंचायत विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत, पण अधिकारी काहीच कारवाई करत नाहीत. दोनवेळा उपोषणाला बसलो, तेव्हा केवळ आश्वासने दिली जातात; मात्र पुढे काहीच होत नाही,’ अशी व्यथा त्यांनी मंत्र्यांसमोर मांडली.