उपजिल्हा रुग्णालयाचा विस्तार कधी होणार?
esakal September 04, 2025 05:45 AM

उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न अनुत्तरित
वाढीव खाटा नसल्याने रुग्णांच्या उपचारात अडथळे

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : बदलापूर पूर्व येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी आजही येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना अजूनही गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात सध्या फक्त ३० खाटांची सोय असून, आवश्यकतेनुसार ५० खाटांची सुविधा देणे अपेक्षित आहे, मात्र वाढती लोकसंख्या, पावसाळ्यात वाढणारे रोगराईचे प्रमाण आणि सीमित बेड यामुळे रुग्णांना मध्यभागी खोलीबाहेर, कॉरिडॉरमध्ये उपचार घ्यावे लागतात.

बदलापूर शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. एकीकडे लोकसंख्या वाढत आहे, मात्र त्या तुलनेत सुविधांचा अभाव असल्याने आरोग्य व्यवस्थेवर त्याचा खूप मोठा ताण पडत आहे. बदलापूर आणि आजूबाजूच्या ग्रामीण पट्ट्यातील रहिवाशांना आरोग्य व्यवस्थेसाठी बदलापूर पूर्वेकडील उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते; मात्र सध्याची लोकसंख्या आणि रुग्णालयात उपलब्ध असणारी वैद्यकीय सुविधा यात मोठी तफावत आहे. अचानक रुग्ण वाढल्यानंतर वैद्यकीय सुविधांवर त्याचा मोठा ताण पडतो.

जवळपास वर्षभरापूर्वीच ग्रामीण रुग्णालय म्हणून सेवा देणाऱ्या या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यापासून वैद्यकीय सुविधा वाढवणे गरजेचे आहे; मात्र या ठिकाणी अद्यापही रुग्णांसाठी या सेवा उपलब्ध नसल्याची रुग्णांकडून खंत व्यक्त केली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी ५० खाटांची सुविधा देणे गरजेचे आहे; मात्र या ठिकाणी ३० खाटांचीच सुविधा उपलब्ध आहे. दुमजली या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रुग्णांसाठी खोल्या असूनदेखील, या ठिकाणी रुग्णांना वरच्या मजल्यावर नेण्यासाठी रॅम्प सुविधा नाही. वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये रुग्णांना नेता येत नाही आणि उपचारासाठी दाखल करता येत नाही.

पावसाळ्यात साथीचे रोग वाढले की उपचारासाठी खोलींच्या बाहेरील मधल्या प्रांगणात खाटा टाकून उपचार करावे लागतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हे रॅम्प बांधून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातून वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सावंत यांनी सांगितले. रॅम्पची सोय लवकर करून देण्यात आली तर ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय रुग्णांसाठी अधिकृतरित्या सेवा देऊ शकेल.

आरोग्य यंत्रणेवर ताण
बदलापूर शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या, आजूबाजच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे वाढते अवलंबन आणि त्या तुलनेत असलेली मर्यादित आरोग्य यंत्रणा यामुळे रुग्णांवर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. रुग्णालयाचा दर्जा वाढवला खरा, पण त्या दर्जाच्या सुविधा न दिल्यास, तो निर्णय कागदावरच मर्यादित राहतो. प्रशासनाकडून लवकरात लवकर रॅम्पचे काम पूर्ण करून, उपजिल्हा रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने लाभ रुग्णांना मिळावा, हीच सध्या नागरिकांची मागणी आहे.

रुग्णालयाकडून आम्हाला पत्रव्यवहार प्राप्त झाल्यापासूनच या ठिकाणी रॅम्प उभारण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. रुग्णांचे होत असलेले हाल लक्षात घेत, प्राथमिक तत्त्वावर या कामाची प्रक्रिया आम्ही जलद गतीने करत आहोत. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून, लवकरच शासकीय सगळ्या अटी-शर्ती पूर्ण करून रुग्णालयात रॅम्पची सोय करून देण्यात येईल.
-प्रशांत कुमार मानकर
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.