'तुंबाड' हा चित्रपट आजही अनेकांची झोप उडवतो. हा चित्रपट एका वेगळ्याच धाटणीत बनवला गेला. धो-धो कोसळणारा पाऊस, भलामोठा वाडा, कुरूप आजी आणि सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला हस्तर. हे सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी नंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. काही महिन्यांपूर्वीच हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात दाखवण्यात आला. तेव्हाही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. आता या चित्रपटातील अभिनेत्री ज्योती मालशे हिने शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला आहे. जेव्हा या चित्रपटासाठी टक्कल करायचं ठरलं तेव्हा ज्योतीचं लग्न ठरलं होतं.
ज्योतीने नुकतीच रसिक मोहिनी या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, ' मला २०१२ मध्ये 'देऊळ' सिनेमाच्या टीममधील एकाकडून सांगण्यात आलं की, 'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेने मला भेटायला बोलावलंय. मी राहीला भेटायला गेले. राहीने तिला स्क्रीप्ट वाचायला सांगितली. मला स्क्रीप्ट प्रचंड आवडली. 'तुंबाड'मधील कोणताही रोल मला करायला आवडेल, असं मी म्हणाले. राहीने मला विनायकच्या आईची भूमिका ऑफर केली. मी ती स्वीकारली. या भूमिकेसाठी मला टक्कल करावं लागेल, असं सांगण्यात आलं. मी तेव्हा नकार दिला कारण तेव्हा माझं लग्न ठरलं होतं.'
View this post on InstagramA post shared by Jyotie Maalashe (@jyotiemaalashe)
ती पुढे म्हणाली, 'माझ्या म्हणण्याचा आदर ठेवत राहीने मला टक्कल असलेली कॅप लावायची परवानगी दिली. दिग्गज आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी ही कॅप डिझाईन केली होती. सुरुवातीला माझा जेवढा रोल सध्या आपण पाहतो त्यापेक्षा छोटासा होता. पुढे २०१५ ला मला राहीचा पुन्हा फोन आला. आपण तुंबाड रीशूट करतोय, असं त्याने मला सांगितलं. २०१५ मध्ये आनंद गांधी क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून 'तुंबाड' सिनेमाशी जोडले गेले. पण त्यावेळी मला टक्कल करावं लागेल, अशी अट घालण्यात आली. आमच्या कुटुंंबात फिल्मी बॅकग्राऊंडशी कोणी नव्हतं. त्यामुळे निर्णय मलाच घ्यायचा होता.''
ज्योती म्हणाली, 'हे ऐकल्यावर दोन दिवस मी संपूर्ण विचारात होते. मला झोप येत नव्हती. माझ्या जवळच्या मित्रांचं मी यासाठी डोकं खाल्लं. सुदैवाने माझा नवरा माझ्या पाठीशी लगेच उभा राहिला. त्यामुळे बिनधास्त हा निर्णय घेतला. माझे कंबरेएवढे केस होते. टक्कल करताना मी कोणालाही बरोबर घेऊन गेले नव्हते. २०१५ मध्ये 'तुंबाड'चं शूटिंग केल्यानंतर मला खूप मोठा ब्रेक घ्यावा लागला. टक्कल केल्याने २ वर्ष मी काही काम केलं नाही. टक्कल केल्यानंतर दोन दिवस मी विग वापरला. पण नंतर मी अशाच अवस्थेत टक्कल घेऊन फिरत होते. एप्रिलमध्ये मी टक्कल केल्याने ते उन्हाळी दिवस माझे सुखाचे गेले.''
'अजूनही तो विचार केला की मला भीती वाटते. म्हणजे वस्तऱ्याने केस कापणं ही फार मोठी गोष्ट होती. नुसता हेअरकट केला तरी आपण थोडेसेच केस कापतो. त्यावेळी मी ते संपूर्ण केस कापले असल्यामुळे तो अनुभव माझ्या अंगावर येणारा होता. दोन-दोन दिवसांनी मला वाढलेले केस कापावे लागायचे. पण सुदैवाने दोन-तीन शूटिंग शेड्युलमध्ये माझं काम झालं होतं.'
पुर्णा आजीची जागा कोण घेणार? 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीने चाहत्यांना केलं आवाहन; म्हणते- विश्वास ठेऊ नका...