आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या सर्वच पक्षात फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. त्यातच आता पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पिंपरी चिंचवडमधील ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार संजोग वाघेरे हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे बोललं जात आहे. संजोग वाघेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात परतणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पिंपरी-चिंचवडमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. या भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांनी शहरातील कार्यकर्त्यांशी आणि प्रमुख व्यक्तींशी संपर्क साधत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागावर पुन्हा एकदा मजबूत पकड मिळवण्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याचे बोललं जात आहे.
त्यातच आता पार्थ पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवार संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी ही सदिच्छा भेट दिली. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान पार्थ पवार यांनी संजोग वाघेरे यांच्यासोबत भोजनही केले. ज्यामुळे वाघेरे लवकरच आपल्या जुन्या पक्षात परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा संभाव्य निर्णय ठाकरे पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक महत्त्वाचे नेतेपार्थ पवार यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या असल्या तरी सर्वाधिक चर्चा ही संजोग वाघेरे यांच्या घरी दिलेल्या भेटीची झाली. वाघेरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर मावळमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर, 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून पिंपरी-चिंचवडमधून निवडणूक लढवली. त्यामुळे, राजकीयदृष्ट्या ते उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक महत्त्वाचे नेते आहेत.
ठाकरे गटाचे मोठे नुकसानपार्थ पवार यांनी थेट वाघेरे यांच्या घरी जाऊन भोजन केल्याने हा त्यांना पुन्हा आपल्या पक्षात परत आणण्याचा एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. अजित पवार यांच्या गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी वाघेरे यांच्यासारख्या अनुभवी आणि लोकप्रिय नेत्याची गरज आहे. त्यामुळे जर संजोग वाघेरे पुन्हा अजित पवार गटात गेले, तर ठाकरे गटाचे शहरात मोठे नुकसान होऊ शकते.