बसमध्ये इन्फ्लुएन्सरसोबत पुरुषाने केलं असं कृत्य; तिने हळूच रेकॉर्ड केला व्हिडीओ अन्..
Tv9 Marathi September 06, 2025 02:45 AM

सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तणूक, विनयभंग, चुकीच्या पद्धतीने स्पर्श, वाईट नजरेनं पाहत राहणं अशा घटना दररोज घडत असतात. या घटनांविरोधात काही महिला आवाज उठवतात. तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने अनेक महिला त्यावर आपल्या भावना किंवा राग व्यक्त करतात. अशाच एका तरुणीने धाडस करून एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही तरुणी बसने प्रवास करत होती आणि तिच्या बाजूला एक पुरुष बसला होता. त्या पुरुषाने बसमध्येच असं कृत्य केलं, जे पाहून तुम्हालाही संताप येईल. संबंधित तरुणीने हळूच त्या व्यक्तीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यावर अनेकजण विविध प्रतिक्रिया देत आहेत.

ही घटना केरळमधल्या एका कंटेंट क्रिएटरसोबत घडली आहे. जी कोच्चीमध्ये राहणारी आहे. इन्स्टाग्रामवर तिचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सतत फॅशनशी संबंधित पोस्ट करते. केरळमध्ये सध्या ओणम या सणाची धूम पहायला मिळतेय. यानिमित्त तीसुद्धा ओणम स्पेशल साडी नेसून, पारंपरिक पद्धतीने साजशृंगार करून बसने प्रवास करत होती. बसमध्ये तिच्या बाजूला एक मध्यमवयीन पुरुष बसला होता. तो पुरुष वारंवार तरुणीकडे वाईट नजरेनं पाहत होता, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. मग हळूच तिने व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केली.

अनेकदा मुलींच्या पोशाखासंदर्भात आक्षेपार्ह कमेंट्स केल्या जातात. त्यामुळे पुरुषांचा हेतू बिघडतो, अशी वक्तव्ये केली जातात. परंतु संबंधित मुलीने साडी नेसली होती आणि पारंपरिक अंदाजात ती नटली होती. तरीसुद्धा बसमध्ये बाजूला बसलेला पुरुष तिच्याकडे अत्यंत वाईट नजरेनं पाहत होता. तो वारंवार तिच्या छातीकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता. मुलगी जेव्हा त्याच्याकडे रागात वळून पाहायची, तेव्हा तो चेहरा दुसरीकडे फिरवायचा. नंतर पुन्हा तेच कृत्य करायचा.

View this post on Instagram

A post shared by Angel____baby (@angel__baby0)

या घटनेचा व्हिडीओ शेअर करत संबंधित तरुणीने लिहिलं, ‘मी बसने प्रवास करताना एक पुरुष माझ्याकडे अत्यंत घाणेरड्या नजरेनं पाहत होता. मी हा व्हिडीओ पोस्ट करतेय, कारण काही लोक नेहमीच मुलीच्या कपड्यांवर आक्षेप घेतात. परंतु या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की मी साडी नेसली होती. यावरून हेच सिद्ध होतंय की मुलींनी कोणतेही कपडे घातले तरी हेच घडतं.’

या व्हिडीओला सोशल मीडियावर तीन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘यावरून हे सिद्ध होतंय की कपड्यांमुळे काही फरक पडत नाही. अशा घटना सर्रास घडत आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू त्याच्या थोबाडीत मारायला हवं होतं. तुझ्याकडे पुरावा होता’, असा सल्ला दुसऱ्याने दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.