रावेत, ता. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेतमधील जाधव घाटावर यंदा एकही गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित झाली नाही, ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली आहे. उत्सवाच्या सातव्या दिवशी गर्दी असूनही सर्व गणेशभक्तांनी केवळ कृत्रिम हौदाचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश मूर्ती विसर्जन केले. अनेकांनी मूर्तीदान उपक्रमातही सहभाग नोंदवत मूर्ती दान केल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून प्रशासन, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक नदी प्रदूषणाविरोधात सातत्याने जनजागृती करत आहेत. त्याचा परिणाम यंदा दिसून आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, निर्माल्यामुळे पाण्यात निर्माण होणारे प्रदूषण टाळण्यात नागरिकांच्या सहभागामुळे यश आले.
पालिकेच्या आरोग्य विभागाने घाट परिसरात कृत्रिम टाक्यांची सोय, स्वच्छतेची व्यवस्था, बॅरिकेट्सद्वारे रस्त्यांचे नियंत्रण केली होती. स्वयंसेवकांनी भाविकांना मार्गदर्शन करून कृत्रिम हौदाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले.
स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, जाधव घाटाने उभारलेला आदर्श इतर विसर्जन घाटांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना नागरिकांनी आणि गणेशभक्तांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात दाखवलेली ही जाणीव आणि जबाबदारी पुढील वर्षांतही कायम राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यातून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.