अनंत चतुर्थदशीला गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यावेळी मुंबईत गणेश भक्तांची उसळणारी गर्दी पाहून मध्य रेल्वेने विशेष सोय केली आहे. गणेशोत्सव विसर्जनासाठी मुंबईकरांचा मोठी गर्दी होत असते. या गर्दीचा ओघ मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. यावेळी भाविकांना घरी परतण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मध्य रेल्वेने उपलब्ध केली आहे.मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर विशेष लोकल चालवण्याची तयारी केली आहे. ६ सप्टेंबर २०२५ रोजी (शनिवार/रविवार मध्यरात्र) दरम्यान हार्बरमार्गावर मध्यरात्री धावणाऱ्या विशेष लोकल गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे.
सीएसएमटी ते पनवेल लोकलमध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( सीएसएमटी ) ते पनवेल या दरम्यानच्या भाविकांसाठी दोन विशेष गाड्या धावणार आहेत. ज्यामध्ये पहिली गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मध्यरात्री १.३० वाजता सुटून पहाटे २.५० वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. तर दुसरी गाडी पहाटे २.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटून ४.०५ वाजता पनवेल येथे दाखल होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पनवेलहून लोकलतसेच पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडेही दोन विशेष गाड्या धावणार आहेत. ज्यात पहिली लोकल पनवेलहून रात्री १.०० वाजता सुटून पहाटे २.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे. तर दुसरी लोकल पनवेलहून मध्यरात्री १.४५ वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ३.०५ वाजता दाखल होईल.
मुख्य मार्गावर विशेष लोकलदरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गाबद्दल (ठाणे-वाशी ) मध्य रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच कळवल्याप्रमाणे, गणेशोत्सवाच्या काळात ४/५, ५/६ आणि ६/७ सप्टेंबर रोजी मुख्य मार्गावर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे) ही मध्यरात्री विशेष गाड्या धावणार आहेत. आता त्यात हार्बर मार्गाचीही भर घालण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गर्दी टाळण्यासाठी या विशेष गाड्यांचा वापर करावा. विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी होत असल्याने रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर ठरणार आहे.
.