Kolhapur Marathi Crime News : पितापुत्र दोघेही साईंचे निस्सीम भक्त, आईचे निधन झाल्याने पुष्कराज वडिलांची काळजी घेत होता. सकाळी घरची कामे आटोपून नोकरीला जायचा. आज गुरुवार असल्याने घरातील देव्हाऱ्यात असलेल्या ‘साईंची पूजा करून घ्या, मी निघतो’ असे सांगून पुष्कराज घराबाहेर पडला. अवघ्या तीन तासांतच वडिलांचा खून झाल्याचे त्याच्या कानावर पडले. आईच्या निधनानंतर वडिलांचेही छत्र हरपल्याने तो पुन्हा एकाकी पडला.
मोहन पोवार यांनी रिक्षा व्यवसायातून दोन मुलींची लग्ने केली. मुलालाही चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांची धडपड होती. मुलाला चांगले शिकवले. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव असल्याने मोहन पोवार यांचा सर्वांसोबत घरोबा होता. मुलालाही त्यांनी हिच शिकवण दिली होती. घरात साईंची मूर्ती असल्याने नित्यनियमाने पूजा असायची. पुष्कराजही भक्ती मार्गात आहे.
आईच्या निधनानंतर दोन्ही बहिणी वडिलांची आणि भावाची विचारपूस करून अधूनमधून घरी यायच्या. चौघांनी एकमेकांना आधार दिला होता. पण, चार खोल्यांच्या घरात मोहन पोवार व पुष्कराज दोघेच राहत होते. चहा, स्वयंपाकही त्यांना जमत होता. वडिलांची काळजी घेता यावी म्हणून पुष्कराजने पूर्वीची नोकरी सोडून घरापासून जवळ असलेल्या संस्थेन नोकरी स्वीकारली होती. अशातच वडिलांचा काहीही दोष नसताना त्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू पुष्कराजला पुन्हा एकाकी करून गेला.
मोहन पोवार यांच्या दोन मुलींची लग्ने झाली आहेत, तर सध्या पुष्कराजच्या लग्नाचीही चर्चा घरी सुरू होती. काही दिवसांपूर्वीच तो एका इंजिनिअरिंग महाविद्यालयात लेक्चरर म्हणून रुजू झाला होता. पिता-पुत्र दोघेच राहत असल्याने त्यांच्याविषयी शेजाऱ्यांमध्ये आपुलकी होती. मोहन पोवार यांचा खून झाल्याचे ऐकूण अनेकांना धक्का बसला. पोवार यांचे शाळेतील, महाविद्यालयातील अनेक मित्रही तातडीने त्यांच्या घराजवळ दाखल झाले.