महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेला याच महिन्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. तर भारतीय महिला संघही पहिल्या जेतेपदासाठी जोरदार तयारी करत आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचं मैदानात उपस्थित राहून मनोबल वाढवण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 30 सप्टेंबर भारत श्रीलंका या सामन्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरपासून तिकीट विक्री सुरू झाली आहे. भारत सरकारने आयपीएल तिकिटांवर वस्तू आणि सेवा कर 28 टक्क्यांवरून 40 टक्के वाढवण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांसाठी पुढील हंगामापासून थेट सामना पाहणे महाग झाले आहे. पण महिला क्रिकेटबाबत ही चित्र उलट आहे. तुम्हाला या स्पर्धेसाठी तिकीटाचे दर मोबाईल रिचार्जपेक्षा स्वस्त आहेत. मोबाईल रिचार्जसाठी तुम्हाला महिन्यासाठी 249 रुपये खर्च करावे लागतात. पण महिला विश्वचषक मैदानात उपस्थित राहून पाहण्यासाठी त्याहून कमी पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण चार दिवसांच्या प्री-सेल विंडोमध्ये तिकीटे खूपच स्वस्त दरात विकली जात आहे.
महिला वर्ल्डकपची तिकीट फक्त 1.14 अमेरिकन डॉलर्स आहे. म्हणजेच भारतीय रुपयानुसार त्याची किंमत फक्त 100 रुपये आहे. त्यामुळे आतापर्यंत क्रिकेट इतिहासाथील सर्वात स्वस्त आयसीसी स्पर्धा ठरली आहे. यापूर्वी आयसीसीची तिकीटं इतक्या स्वस्त दरात कधीच विकली गेली नाहीत. वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये पार पडली. यावेळी या स्पर्धेचं तिकीट हे मुलांसाठी 7 न्यूझीलंड डॉलर, तर प्रौढांसाठी 17 न्यूझीलंड डॉलर होती. म्हणजेच मुलांसाठी 350 रुपये आणि पौढांसाठी 850 रुपये इतकी होती. त्या तुलनेत ही किंमत खूपच कमी आहे.
महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13वं पर्व आहे. या स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा वरचष्मा राहिला आहे. तर एकदा न्यूझीलंडने जेतेपद जिंकला आहे. आयसीसीने महिला विश्वचषक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. विजेत्या संघाला 13.88 दशल अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांचा समावेश आहे.