किवळे, ता. ५ : मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा गहुंजे येथे ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधून ५२० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यातील ३० खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मावळ तालुका क्रीडा अधिकारी सुरेश काकड, स्कूलचे विश्वस्त साहेबराव बोडके, दीपक बोडके, प्राचार्य विजिला राजकुमार, क्रीडा प्रमुख मनोज स्वामी उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य निरीक्षक म्हणून रशीद इनामदार यांनी कामकाज पाहिले. समीर इनामदार आणि महादेव माळी यांनी सहाय्यक निरीक्षकाची जबाबदारी पार पाडली. यावेळी मावळ तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी यांचीही उपस्थिती होती.