शिक्षकांसमोर नवसमाज घडविण्याचे आव्हान
esakal September 06, 2025 05:45 AM

स्वातंत्र्यपूर्वकाळ आणि त्यानंतरचा कालावधी यात खूप बदल झालाय. त्यावेळी शिक्षकांसमोरची उद्दिष्ट वेगळी होती. आता शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा प्रचंड वाढलाय. मात्र यातूनच मार्ग काढून नवी पिढी घडवायची आहे. केवळ शाळेत किंवा चार भिंतीच्या आत काम करून जे साधत नाही ते बिनभिंतीच्या शाळेतून विद्यार्थ्यांना अनुभव देऊन विद्यार्थ्यांचे अनुभव क्षेत्र विकसित करणे हेही शिक्षकांचे काम आहे. आजच्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने केलेल चिंतन

आपल्या देशातील प्राचीन आणि उदात्त संस्कृती असलेल्या देशात शिक्षक हा सर्वांगीण जीवनाचा भाष्यकार आणि शिल्पकार होता. त्याची बैठक नैतिक आणि आध्यात्मिक होती. गुरुकुलपद्धतीमधून शिक्षक काम करीत होते. ज्ञान, तपसाधना, निष्कलंक चारित्र्य, नैतिकता आणि गुणवत्ता ही शिक्षकांच्या विचारांची पंचसूत्री होती. त्यांच्या वर्तनाला आणि शब्दाला समाजात किंमत होती. अर्थप्राप्ती, सेवाशर्ती, सेवाज्येष्ठता निवृत्तीचे कायदे आणि संघटना अशा व्यावहारिक प्रश्नांना शिक्षकांच्या आयुष्यात कोणतेही स्थान नव्हते.

अभ्यास विषय शिक्षकच ठरवीत होते आणि परीक्षकही शिक्षकच असत. यानंतर काळाच्या ओघात शिक्षकांच्या स्थानाला हादरे बसले. शिक्षकाने काय शिकवायचे आणि कसे शिकवायचे याचा विचार इतर लोक करू लागले. वरच्या वर्गातील निवडक लोकांचे शिक्षण इंग्रजी माध्यम आणि पाझर पद्धतीने खालच्या पातळीपर्यंत शिक्षण जावे हे धोरण इंग्रजांचे होते. या घडामोडीत शिक्षकांचे स्थान फक्त विचारप्रसारक एवढ्या पुरतेच मर्यादित झाले.

स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय स्वातंत्र्याचा ध्येयवाद शिक्षकांच्या मनाला आणि स्थानाला एक विशिष्ट दर्जा बैठक पुरवून शिक्षकांच्या मनाचे पोषण करीत होता. शिक्षकांकडून समाजाच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्यांचा दर्जा आणि जबाबदाऱ्याही वाढल्या होत्या. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची प्रेरणा विकसित व्हावी हा प्रमुख उद्देश होता. या पिढीतील शिक्षकांचे उगवत्या पिढीवर चारित्र्य, व्यावसायिक निष्ठा, राष्ट्रभक्ती, नैतिकता, शिस्त, प्रामाणिकपणा याबाबतीत संस्कार झाले. अल्प मोबदला असूनही शिक्षक उच्च दर्जाचे काम करीत होते. शिक्षकांच्या नावाने शाळा ओळखल्या जात होत्या, एवढ्या उत्तुंग विचारांची आणि कर्तृत्वाची माणसे होती ती. हळूहळू शिक्षणाचा प्रसार झाला त्यामुळे शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली. बहुसंख्य शिक्षक केवळ नोकरीसाठीच या व्यवसायात आले.

स्वातंत्र्यानंतर शिक्षणप्रसार खूप झाला; पण गुणवत्तेकडे लक्ष दिले गेले नाही. शिक्षकांसमोर ध्येय राहिले नाही. धोरणकर्ते, समाज आणि शिक्षक यांच्यातली दरी वाढतच गेली. शिक्षकांकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम झाला. प्राथमिक शिक्षक सामान्य दर्जाचा, माध्यमिक त्याहून थोडा वरचा आणि महाविद्यालयीन आणि विद्यापीठ दर्जाचा म्हणजे प्रतिष्ठेचा अशा विविध पातळ्या समाजात तयार झाल्या. सर्व पातळीवरच्या सर्व शिक्षकांची शक्ती धडे व अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर केंद्रित झाली. पाठ्यपुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊन त्यांना वर्षाअखेरीस उत्तीर्ण करणे एवढेच मर्यादित उद्दिष्ट शिक्षकांचे झाले.

परीक्षांसाठी तयारी करून घेणे हेच शिक्षकांचे मुख्य उद्दिष्ट बनले. याचा परिणाम असा झाला की शाळेबाहेर खासगी अभ्यास वर्गांचे प्रमाण वाढले त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांचे स्थान हळूहळू डळमळीत होऊ लागले. आज शिक्षकांकडे अशैक्षणिक कामेच जास्त आहेत. जनगणना, आरोग्यप्रसार, निवडणुका, कुटुंबनियोजन, सांस्कृतिक समारंभ, झाडे लावा झाडे जगवा, प्रौढ शिक्षण व राजकीय प्रसारात साधन म्हणून त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. त्यांचे मुख्य क्षेत्र शाळा राहिलेच नाही. एवढ्यावर समाज आणि सरकार थांबले नाहीत तर कथा कादंबऱ्या चित्रपट नाटके या क्षेत्रामधूनही शिक्षकांची चेष्टा करण्याची संधी सोडलेली नाही.

आत्मपरीक्षणाची गरज

समाजातल्या शिक्षकांच्या प्रतिमेला अत्यंत विकृत स्वरूप शासनाने आणले आहे. आर्थिक दृष्टीने शिक्षक आज प्रबळ झाला आहे पण सामाजिक दृष्टीचे काय? अशा वास्तव परिस्थितीत नवी पिढी कशी निर्माण होणार हा प्रश्न साऱ्या देशासमोर उभा आहे. आज राज्य सरकारने शिक्षणाच्या सर्व गोष्टींवर जे नियंत्रण आणले आहे त्यामुळे शिक्षकांचे स्वातंत्र्य व शिक्षकांचा विचार यांना कसलाच अर्थ उरला नाही. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, वेळापत्रक, सुट्ट्या, परीक्षा, कामाचे दिवस, नैमित्तिक समारंभ, सहली, क्षेत्रभेटी या सर्वांवरच्या अवाजवी नियंत्रणामुळे शिक्षकांमधील उत्साहच हिरावून घेतला आहे. शिक्षकांना केवळ एक बाहुले केलेले आहे. आज शिक्षकच केवळ निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत नाहीत तर संपूर्ण समाज या व्याधींनी व्यापलेला आहे हे कटू सत्य आहे. हे कमी करण्यासाठी त्याग फक्त शिक्षकांनीच करायचा का? सकारात्मक विचार फक्त शिक्षकांनीच करायचा का? ध्येयवादाची जबाबदारी फक्त शिक्षकांचीच आहे का? लोकशाही फक्त शिक्षकांनीच सांभाळायची का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

देश विकसित करायचा असेल तर शिक्षकांनी थोडे आत्मपरीक्षण केले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वतः शिकू दिले पाहिजे आणि कसे शिकावे हे शिकविले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. ग्रंथालय, आकाशवाणी, दूरदर्शन आणि डिजिटल टेक्नॉलॉजी अशा सर्व साधनांचा कसा उपयोग करायचा हे विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. विद्यार्थ्यांना घोकमपट्टीमधून बाहेर काढून स्वयंअध्ययनाची सवय लावली पाहिजे. परीक्षांचे ओझे कमी करून परीक्षांचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे याबाबतीत शासनावर दबाव आणला पाहिजे. हा बदल झाल्याशिवाय आजचे दुष्टचक्र थांबणार नाही. शिक्षकांनी स्वतःचा व्यासंग वाढवणे गरजेचे आहे. तुरळक अपवाद सोडले तर सर्व थरातील बहुसंख्य शिक्षक वाचत नाही असा अनुभव आहे. स्वतःची टिपणे काढणे, विविध चर्चासत्रांमध्ये भाग घेणे दैनिक चिंतन करणे, सभोवतालच्या भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात जे बदल घडत आहेत त्याचे डोळस चिंतन करून राज्यघटनेचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचवणे हे शिक्षकांचेच काम आहे.

Pune News : पुण्यात खड्ड्यांचे ‘जिवंत देखावे’ गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ते दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

समाजात जे छोटे मोठे प्रकल्प घडत आहेत तेथे योग्य संधी साधून विद्यार्थ्यांना नेले पाहिजे व त्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. यामधून विद्यार्थ्यांची अनुभव संपन्नता वाढून विद्यार्थ्यांना नवनवीन कर्तृत्वाची क्षेत्रे दिसतील. व्यसनमुक्ती, विज्ञानप्रवृत्तीचा, विकास तंत्रज्ञानातली अस्पृश्यता नाहीशी करणे. उद्योगशीलता अंगी आणणे याबाबतीत विद्यार्थ्यांच्या उत्साहाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना समृद्ध केले पाहिजे. केवळ शाळेत किंवा चार भिंतीच्या आत काम करून जे साधत नाही ते बिनभिंतीच्या शाळेतून विद्यार्थ्यांना अनुभव देऊन विद्यार्थ्यांचे अनुभव क्षेत्र विकसित करणे हेही शिक्षकांचे काम आहे. नवसमाज घडविण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले की त्यांचे भावी जीवन समाज जीवनास पोषक आणि प्रेरक ठरेल असा विचार या शिक्षक दिनी आपण करूया त्यासाठी सर्व शिक्षकांना शुभेच्छा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.