Jalgaon Municipal Election : जळगावच्या निवडणुकीचे 'गणित' बदलले! नव्या प्रभागरचनेमुळे राजकारणात खळबळ
esakal September 06, 2025 02:45 AM

जळगाव: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.३) जळगाव महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. या नव्या आराखड्यात फारसा बदल झाला नसला तरी यात प्रभाग ५, ८, ९, १०, १५, १६, १७ या प्रभागांमध्ये लक्षणीय बदल झालेला दिसून येत आहे. या बदलांमुळे अनेक इच्छुक उमेदवारांची गणिते कोलमडली असून, त्यांना आता नव्याने प्रभाग निवडण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप रचनेनुसार काही प्रभागांचे सीमांकन बदलले गेले असून, काही प्रभागांचे विलीनीकरण, तर काहींचे विभाजन करण्यात आले आहे. परिणामी, ज्या उमेदवारांनी गेल्या काही महिन्यांपासून विशिष्ट प्रभागात जनसंपर्क वाढवला होता, त्यांना आता नव्या प्रभागात पुन्हा शून्यापासून सुरवात करावी लागणार आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतर्गत बैठका, रणनीती ठरवणे व नव्या प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांची मांडणी करण्याचे काम सुरू झाले आहे.

नव्यांना संधी मिळणार?

या बदलांमुळे काही प्रभागांमध्ये स्थानिक नेत्यांचे वर्चस्व डळमळीत झाले आहे. विशेषतः ज्या प्रभागांमध्ये सामाजिक समीकरण महत्त्वाचे ठरते, तेथे नव्या रचनेमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, काही नवोदित उमेदवारांना या बदलांमुळे संधी मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

हरकतींसाठी १५ सप्टेंबरची मुदत

हरकती घेण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मुदतीत आलेल्या सर्व व सूचनांची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान केली जाईल. नागरिकांच्या अभिप्रायाचा विचार करून अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे. नागरिकांनी वेळेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दृष्टिक्षेपात प्रभागरचना

प्रभाग ५ मध्ये शाहूनगर हा भाग वगळल्याने एकगठ्ठा मतदानाचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता

पिंप्राळा परिसराचा काही भाग वेगळा तर गावठाण भाग एकत्र झाल्याने तीन प्रभागांवर परिणाम

प्रभाग १५, १६, १७ मध्ये अनेक परिसर हे एकमेकांमध्ये समाविष्ट झाल्याने उमेदवारांची पंचाईत

आदर्श नगर, मेहरुण परिसर, जुने जळगाव, एमआयडीसी, सुप्रीम कॉलनी हे भाग नवीन प्रभागांना जोडल्याने मतांचे गणित बिघडले.

प्रभाग १९ मध्ये आधी तीन सदस्य संख्या होती. आता चार असेल आणि प्रभाग १८ मध्ये तीन सदस्य संख्या असेल.

Modi Manipur Visit : मोदींच्या मणिपूर दौऱ्याआधीच सरकारला मिळालं मोठं यश! राज्याची ‘लाईफलाइन’ झाली सुरू

जुन्यांना जुळवावी लागणार नवीन समीकरणे

प्रभागरचनेतील बदल हे निवडणुकीच्या रणनीतीवर मोठा परिणाम करणारे ठरणार आहेत. पक्षांनी आता नव्या रचनेनुसार उमेदवारांची निवड, प्रचार यंत्रणा व स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू करावी लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.