Car Accident : देव दर्शनाला जात असताना कार दुभाजकाला धडकली प्रांताधिकाऱ्यांच्या मुलीचा मृत्यू, इक्षिताचा दोन दिवसांपूर्वी झाला होता वाढदिवस
esakal September 06, 2025 06:45 AM

Divider Road Accident : कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. हा अपघात पंढरपूर महामार्गावर दसुरपाटीनजीक झाला. या अपघातात कडेगाव-पलूसचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांची कन्या इक्षिता रणजित भोसले (वय ६, रा. राजवडी, ता. माण, जि. सातारा) हिचा मृत्यू झाला. ही घटना काल बुधवारी (ता. ३) सायंकाळी पाच वाजण्यास सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी (ता. २) इक्षिता हिचा वाढदिवस होता. यादिवशी सर्व कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात तिचा वाढदिवस साजरा केला होता, तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी काल बुधवारी (ता. ३) प्रांताधिकारी भोसले यांचे सासू - सासरे, इक्षिता व अन्य नातेवाईक असे एकूण पाच जण राजवडीहून मोटरकारने पंढरपूरला देवदर्शनाला निघाले होते.

Kolhapur RTO : MH 09 HB सीरियल आता सर्वांसाठी खुली, ९०० नंबरमुळे प्रादेशिक परिवहन विभागाचा केला खेळखंडोबा

जात असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर महामार्गावर दसुरपाटीनजीक सदर कार रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात डोक्याला मार लागून इक्षिता गंभीर जखमी झाली. त्यानंतर नातेवाइकांनी तिला अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, तर अपघातात मोटारकारमधील अन्य चारजण किरकोळ जखमी झाले. आज गुरुवारी (ता. ४) राजवडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन उद्या शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजता राजवडी येथे होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.