उंडवडी, ता. ५ : बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना विजेच्या भारनियमनाचा आणि लंपडावाचा चटका बसत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी महावितरणकडे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषीपंपांसाठी अर्ज करून आवश्यक रक्कम भरली. मात्र, सहा महिने उलटूनही पंप मिळालेला नाही. परिणामी शेतकरी त्रस्त झाले असून, कुणी सौर पंप देता का? अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शाश्वत पर्याय म्हणून राबविण्यात येते. या योजनेत सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १० टक्के, तर अनुसूचित जाती- जमातीतील शेतकऱ्यांना ५ टक्के रक्कम भरण्याची मुभा आहे. उर्वरित खर्च केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात केला जातो. यामध्ये ३ ते ७.५ एचपी क्षमतेचे पंप देऊन पाच वर्षांची दुरुस्ती हमी आणि विम्याची सोय केली जाते. त्यामुळे शेतकरी वीजबिलाच्या कटकटीतून मुक्त होऊन भारनियमनाच्या चिंतेतून सुटतात.
मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत कमालीचा विलंब होत आहे. ऑनलाइन अर्ज व रक्कम भरून ‘ए-वन’ मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पंप निवडावा लागतो. मात्र, साठा अत्यल्प असल्याने बुकिंग सुरू होताच काही मिनिटांतच संपतो. अपेक्षित कंपनीचा पंप मिळेलच, याची खात्रीही नसते. परिणामी शेतकरी वारंवार प्रयत्न करूनही हताश होत आहेत. शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवायचा असेल, तर महावितरणने तातडीने पुरेसा सौर पंपांचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अन्यथा शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
विहिरीवरील कृषी पंपासाठी पैसे भरून सहा महिने उलटले. अजून पंप मिळालेला नाही. ऑनलाइन निवड देखील झाली आहे. प्रत्यक्षात विहीरीवर सौर पंप कधी बसणार याबाबत कुणीच काय सांगत नाही.
- शहाजी गवळी, शेतकरी, उंडवडी सुपे
मी सौर पंपासाठी एक वर्षापूर्वीच पैसे भरले. विजेच्या लंपडावाला कंटाळून सौर ऊर्जेकडे वळलो, पण आता इथेही अडचणीच अडचणी आहेत.
- दत्तात्रेय वावगे, उपाध्यक्ष, बारामती तालुका दूध संघ