मुंबई - सोलापूर येथील करमाळा प्रकरणात महिला पोलिस अधिकाऱ्याला धमकाविल्याप्रकरणात खुलासा करीत याबाबत कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी या घटनेबाबत ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून स्पष्टीकरण दिले आहे. ‘सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांबरोबरील संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.
यात माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये या काळजीपोटी होता. पोलिस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला आदर आहे.
माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदा वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदा कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे,’ असे त्यांनी यात म्हटले आहे.
कोणतीही चूक नाही नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरध्वनी संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळे वळण देऊन मित्रपक्षांकडूनच लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.